'मराठवाडा मुक्ती संग्रामात' विसरलं जातंय 'या' नऊ भूमिपुत्रांचं बलिदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 09:02 AM2019-09-17T09:02:21+5:302019-09-17T09:10:32+5:30

घोडेखुरची लढाई म्हणून इतिहासात बीड जिल्ह्यातील आणखी एक सशस्त्र लढा प्रसिद्ध आहे.

Sacrifice of 9 Bhumiputras 'forgotten' in Marathwada liberation struggle of 17 september 1948 | 'मराठवाडा मुक्ती संग्रामात' विसरलं जातंय 'या' नऊ भूमिपुत्रांचं बलिदान

'मराठवाडा मुक्ती संग्रामात' विसरलं जातंय 'या' नऊ भूमिपुत्रांचं बलिदान

googlenewsNext

औरंगाबाद - ब्रिटीश आणि निजाम सरकारविरोधात सशस्त्र लढा उभारण्यात बीडच्या क्रांतिकारकांची भूमिका संपूर्ण मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात उल्लेखनीय राहिली आहे. 1857 च्या उठावाआधी जवळपास 40 वर्षे आधी बीड जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी सशस्त्र उठाव केला होता. बीड जिल्ह्याने हैदराबाद मुक्ती संग्रामात सशस्त्र उठाव अनेकदा केले आहेत. या जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी केलेल्या उठावाची दखल अनेकदा ब्रिटीश सरकारलाही घ्यावी लागली होती. मात्र, मराठवाडा मुक्ती संग्रामात बीडमधील 9 भूमिपुत्रांच्या बलिदानाचा सर्वांनाच विसर पडला आहे.  

हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्मरणात राहण्यासारखी पण आता सोयीस्करपणे विसरलेली एक घटना म्हणजे 3 तारखेची दंगल होय. रझाकारांनी बीडच्या बारादरीच्या इमारतीतील निजामकालीन न्यायालयात नऊ जणांना एकदाच फाशी दिली. डॉ. सतीश साळुंके सांगतात की, बीड शहरातील बारादरी या ऐतिहासिक वास्तूत ही घटना घडली. अहमदनगरच्या शूर सरदार सुल्तानजी निंबाळकरांच्या निवासस्थानासाठी ही वास्तू उभारली होती. निंबाळकर बीडमध्ये असताना या वास्तूत रहात. पुढे हैदराबाद संस्थानात बीड विलीन झाल्यावर निजामाने या वास्तुचे रुपांतर न्यायालयात केले. राज्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांवर येथे खटले चालविण्यात आले. याच ठिकाणी बीड शहरातील नऊ तरुण स्वातंत्र्य सैनिकांना एकाचवेळी फासावर लटकाविण्यात आले होते. निजाम सरकारच्या विरोधात हिंदू- मुस्लिम बांधवांनी पुकारलेल्या ‘तीन तारखे’च्या दंगलीत एकाच वेळी बीड शहरात नऊ शूरवीरांना जुलमी रझाकारांनी फाशी देऊन अत्याचाराचा कळस गाठला. मात्र, दुर्दैवाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होताना या महत्त्वपूर्ण घटनेचा अनेकांना विसर पडला.

घोडेखुरची लढाई म्हणून इतिहासात बीड जिल्ह्यातील आणखी एक सशस्त्र लढा प्रसिद्ध आहे. केज तालुक्यातील शहाजी व धोंडीजी मुंडे या स्वातंत्र्यवीरांनी बीड सशस्त्र सैन्यदल उभा करून निजाम आणि ब्रिटीशांविरोधात बंड पुकारले होते. या परिसरातील निजामधार्जिण्या श्रीमंतांना लुटून स्वातंत्र्य लढ्यासाठी आर्थिक मदत उभी करण्याचे मोठे काम यांनी केले होते. बीड जिल्ह्यातील घोडेखूर परिसरात सशस्त्र सैन्यदल तयार करण्यात येत असल्याची कुणकुण ब्रिटीश आणि निजाम सरकारला लागल्यानंतर त्यांनी अत्यंत घनदाट जंगलात असलेला हा परिसर चाफेर वेढला. यावेळी स्वातंत्र्यवीरांनी निजाम सरकारच्या सैन्यावर हल्ला चढवून त्यांना सळो की पळो केले होते.
या कारनाम्याची दखल घेत मुंबईच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने बीडच्या अधिकाऱ्याला एक खरमरीत पत्र लिहून आम्ही 1857 चा उठाव दडपून टाकला आणि त्यापेक्षा हा उठाव मोठा आहे का, असा खोचक सवाल केला होता. घोडेखूरच्या मुंडे बंधूंची माहिती लोकमान्य टिळकांना मिळाल्यानंतर त्यांनी घरच्या घरी बंदुका तयार करण्याचे एक मशीन या दोघांना दिले होते. शिरूर परिसरातील कान्हा भिल्लाने मुक्तीसंग्रामात दिलेले सशस्त्र योगदानही उल्लेखनीय असेच आहे.

शिरूर परिसरात श्रीमंतांना लुटून हा पैसा स्वातंत्र्यलढ्यासाठी पुरविण्याचे काम तर या कान्हाने केलेच, परंतु त्याचवेळी त्याने सशस्त्र सैनिक तयार करण्याचे कामही केले. निजाम सरकारच्या सैनिकांवर अनेकदा हल्ले चढविल्यानंतर चिढलेल्या निजाम सरकारने कान्हाला पकडून त्याला कडब्याच्या गंजीत घालून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही तो चतुराईने वाचला, परंतु त्यानंतर त्याला कनकालेश्रवर मंदिराच्या मागील टेकडीवर निजाम सरकारच्या सैनिकांनी फासावर लटकविले. 

Web Title: Sacrifice of 9 Bhumiputras 'forgotten' in Marathwada liberation struggle of 17 september 1948

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.