Maharashtra Election 2019: Raju Shinde's 20 km padyatra in 15 hours | Maharashtra Election 2019 : १५ तासांत राजू शिंदेंची २० कि.मी. पदयात्रा

Maharashtra Election 2019 : १५ तासांत राजू शिंदेंची २० कि.मी. पदयात्रा

ठळक मुद्देमतदारांच्या भेटीगाठी; भुकेची, थकव्याची तमा नाही

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने दिवसभरात फक्त आणि फक्त मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह गल्लोगल्ली जाऊन  प्रचारफेरी, पदयात्रा, बैठका, सभेतून रात्री उशिरापर्यंत मतदारांशी संवाद हा आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा दिनक्रम. भूक, तहान आणि थकवा विसरून प्रचारासाठी १५ तास देऊन सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मतदारसंघाचा परिसर अक्षरश: पिंजून काढतात. विशेष म्हणजे पदयात्रेतून दिवसभरात जवळपास २० कि.मी.पेक्षा अधिक अंतर पायी फिरतात.

‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी राजू शिंदे यांच्यासमवेत संपूर्ण दिवस घालविला. या दिवसभरात शिंदे यांची प्रचाराची रणनीती जाणून घेतली. सकाळी ६ वाजेपासून त्यांचा दिनक्रम सुरू झाला.  सकाळपासून त्यांचा मोबाईल सतत वाजत होता. कार्यकर्त्यांचे फोन येत होते. नियोजनाप्रमाणे सकाळी ७ वाजता प्रचारासाठी ते घराबाहेर पडणार होते. त्यामुळे तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते घराबाहेर पोहोचले होते. प्रारंभी काही वेळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्नी माया शिंदे यांनी घराबाहेर पडताना त्यांचे औक्षण केले. औक्षण करतानाही फोनवरून ते संवाद साधत होते. त्यातून त्यांच्या व्यस्त दिनक्रमाची काहीशी झलकच पाहायला मिळाली.

निवासस्थानाहून रवाना झाल्यानंतर राजू शिंदे यांनी बीड बायपासवरील हिवाळे लॉन्स येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भेट घेतली. काही वेळ चर्चा केल्यानंतर बीड बायपास, शिवाजीनगरमार्गे राजू शिंदे सूतगिरणी चौकात पोहोचले. येथे उद्योजकांसोबत बैठक झाली. उद्योजकांशी विविध मुद्यांवर संवाद साधला. हा संवाद साधेपर्यंत सकाळचे १० वाजून गेले होते. यानंतर नियोजनाप्रमाणे ११ वाजता उस्मानपुरा, पीरबाजार येथील पदयात्रेसाठी ते रवाना झाले.याठिकाणी शिंदे यांचे आगमन होताच ढोल-ताशा वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी शेकडो नागरिक, महिला, कार्यकर्ते जमले होते. प्रारंभी राजू शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याठिकाणी शिंदे यांनी सिद्धांत गाडे यांची भेट घेतली.

त्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली. पीरबाजार, फुलेनगर, एकनाथनगर, मिलिंदनगर, छोटा मुरलीधरनगर परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिक पुष्पहार घेऊन उभे होते. औक्षण करण्यासाठी ताट घेऊन घराघरांसमोर महिला उभ्या होत्या. राजू शिंदे पोहोचताच उत्साहात स्वागत करण्यात येत होते. महिलांकडून ओवळले जात होते. तब्बल २ तास पदयात्रा चालली. दुपारचे १२ वाजून गेले. ऊन चटकत होते. पदयात्रेत अनेक नागरिक  ‘पाण्याचा प्रश्न सोडवा’ अशी साद घालत होते. यावेळी कृष्णा बनकर, बंडू कांबळे, प्रकाश निकाळजे, मधुकर चव्हाण, विजय भुईगळ, दिनकर ओंकार आदी उपस्थित होते.

उस्मानपुरा परिसरातील पदयात्रेनंतर दुपारी १ वाजता राजू शिंदे छावणीतील पदयात्रेसाठी रवाना झाले. छावणी, गवळीपुरा येथील साईबाबा मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. तोफखाना, दानाबाजार, पटेल चौक, सुभाष पेठ  भागातून ही पदयात्रा काढण्यात आली. पटेल चौक येथे नागरिकांनी राजू शिंदे यांच्यावर पुप्षवृष्टी केली. पदयात्रेप्रसंगी विजय चौधरी, नीलेश धारकर, पाशा खान, सनी गारोळ, मयंक पांडे, रमेश लिंगायत, एम. ए. अझहर, ओमकार सिंग आदी उपस्थित होते.  

शिवाजीनगर रेल्वेगेटवर १९ मिनिटे अडकले
छत्रपतीनगर येथील सभेला पोहोचण्यापूर्वी शिवाजीनगर रेल्वेगेटवर तब्बल १९ मिनिटे वाहनांच्या गर्दीत अडकण्याची वेळ आली. रेल्वेगेटवर थांबल्यानंतर अवघ्या ७ मिनिटांत रेल्वे रवाना झाली. मात्र, वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढून बीड बायपासवर पोहोचेपर्यंत १९ मिनिटे लागली. त्यानंतर शिंदे सभास्थळी पोहोचले. सभेला विनायक हिवाळे पाटील, अप्पासाहेब हिवाळे, अनिल चोरडिया, अभिषेक देशमुख, यशवंत कदम, राजू काका नरवडे आदी उपस्थित होते. ४सभा सुरू असताना एकेकाचे मनोगत सुरू होते. यात काहींनी शिवाजीनगर रेल्वेगेटवरील समस्येचा मुद्दाही उपस्थित केला. सर्वांचे मनोगत होत असताना राजू शिंदे अनेक बाबी टिपून घेत होते. सभेच्या मंचावर पत्नी माया शिंदे यांचीही उपस्थिती होती. याठिकाणी राजू शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सभा संपेपर्यंत ९.३० वाजून गेले होते. 

१०२ वर्षांच्या आजींनी केले स्वागत
मिलिंदनगर येथील पदयात्रेत १०२ वर्षांच्या सुपडाबाई वाकेकर यांनी राजू शिंदे यांचे केलेले स्वागत पाहण्यात प्रत्येक जण हरखून गेला. राजू शिंदे यांचे आगमन होताच या आजींनी अगदी मायेने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरविला आणि आशीर्वाद दिला.

 

एक कप चहा फक्त...
छावणीनंतर दुपारी २.५० वाजता राजू शिंदे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले. येथे त्यांनी जिल्हा वकील संघाशी चर्चा केली. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणी, सचिव डॉ. संदीप शिरसाट, अ‍ॅड. संजय भिंगारदेव, अ‍ॅड. दीपक म्हस्के, अ‍ॅड. आर. के. मोकळे, अ‍ॅड. पी. एस. भालेराव, अ‍ॅड. व्ही. एस. वर्धे आदी उपस्थित होते. सकाळी बाहेर पडलेल्या राजू शिंदे यांनी वकिलांसोबत चर्चा करताना चहा घेतला. त्यानंतर वेगवेगळ्या कक्षात वकिलांची शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी अ‍ॅड. बी. एच. गायकवाड यांचीही भेट झाली.

फाटलेला विकास शिवायचा...
- जिल्हा सत्र न्यायालयातून रवाना झाल्यानंतर राजू शिंदे दुपारी ४.१० वाजता हनुमाननगर येथे पोहोचले. याठिकाणी ओम चव्हाण यांच्या निवासस्थानी नागरिकांसोबत बैठक झाली. 
- यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करताना राजू शिंदे यांनी सोफ्याऐवजी नागरिकांसोबत सतरंजीवरच बसणे पसंत केले. ‘जो विकास फाटलेला आहे, तो आता शिवण्याची वेळ आली आहे’, असे ते म्हणाले. यावेळी सचिन जैन, अलीम पटेल, घनश्याम कुमावत, राजू पठाण, गणेश गोरे आदी उपस्थित होते. 
- यानंतर त्यांनी देवळाईतील हरिप्रसादनगरमधील नागरिकांशी संवाद साधला. येथून ते थेट  बालाजीनगर, पंचशीलनगर येथील पदयात्रेसाठी पोहोचले. तोपर्यंत सायंकाळचे ५.१५ वाजले होते. प्रारंभी नागरिकांशी संवाद साधून परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. 
- यावेळी विजय मगरे, जगन्नाथ कोºहाळे, विजय काळे आदी उपस्थित होते. पदयात्रा संपेपर्यंत अंधार पडला होता. सायंकाळी ७ वाजता साताऱ्यातील छत्रपतीनगर येथील जाहीर सभेसाठी राजू शिंदे रवाना झाले. 

Web Title: Maharashtra Election 2019: Raju Shinde's 20 km padyatra in 15 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.