Maharashtra Election 2019: Aurangabad West: New voters queue up and vote | Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम : नवमतदारांनी रांगा लावून उत्साहात केले मतदान 

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम : नवमतदारांनी रांगा लावून उत्साहात केले मतदान 

ठळक मुद्देज्येष्ठांना युवकांची मदत 

औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध केंद्रांवर मतदान करण्यासाठी युवकांमध्ये उत्साह होता. अनेक केंद्रांवर नवमतदारांनी रांगा लावून मतदान केले. त्याच वेळी वृद्ध मतदारांनाही मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेण्याचे कार्य युवकांनीच पार पाडले. सकाळपासून मतदानाची गती मंदच होती. दुपारनंतर त्यामध्ये वाढ झाली.

शिवसेनेचे आ. संजय शिरसाट, अपक्ष राजू शिंदे आणि एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट या चार प्रमुख उमेदवारांचे कार्यकर्ते बुथवर दिसले. चार उमेदवार मतदारसंघात फिरत होते.सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही केंद्रांवरील मतदान यंत्रातील व्हीव्हीपॅटच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ते व्हीव्हीपॅट बदलण्यात आल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पाराणी भोसले यांनी दिली. कडा कार्यालयातील केंद्र क्रमांक २२०  मधील ईव्हीएम मशीन दुपारी १ वाजता बंद पडले होते. हे मशीन अधिकाऱ्यांनी दहा मिनिटांमध्येच बदलले. त्यानंतर मतदान सुरळीतपणे सुरू झाल्याचे केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदान केंद्र क्रमांक १८५ वर ८५ वर्षीय शेख महेबूब यांना मतदानासाठी त्यांच्या नातलगांनी अक्षरश: उचलून आणले होते.  इतरही ठिकाणी वृद्ध मतदारांना युवकांनी मदत करून केंद्रापर्यंत घेऊन आले. त्यांचे मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या रिक्षामधून मतदारांना घरापर्यंत सोडण्यात आले. याशिवाय मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शिवाजीनगर, सातारा, देवळाई, छावणी, गारखेडा, शहानूरमियां दर्गा, पोद्दार हायस्कूल, कडा कार्यालय आदी मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळपर्यंत किरकोळ अपवाद वगळता मतदान केंद्रांवर कोठेही गोंधळ झाला नाही.

कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती. बिहार, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड येथून विशेष राखीव दलाच्या जवानांना केंद्राबाहेर तैनात केले होते. बंदूकधारी सुरक्षारक्षकांनी नेमून दिलेल्या ठिकाणापासून दूर अंतरापर्यंत वाहनांना येऊ दिले नाही. तसेच विविध पक्षांच्या मतदान यादीतील नाव शोधून देणारे एजंटही आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर बसविण्यात आले होते. एकू णच प्रत्येक केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तगडी होती.

औरंगाबाद पश्चिममध्ये असा वाढला मतदानाचा टक्का
सकाळी ७ ते ९ वाजता    :    ४.३ टक्के
सकाळी ९ ते११ वाजता    :    १२.५१ टक्के
दुपारी ११ ते १ वाजता    :    २८.०२ टक्के
दुपारी १ ते ३ वाजता    :    ४०.०३ टक्के
सायंकाळी३ ते ५ वाजता    :    ५३.०४ टक्के 
सायंकाळी ५ ते ६ वाजता    :    ६१.३२ टक्के

Web Title: Maharashtra Election 2019: Aurangabad West: New voters queue up and vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.