भाजपत 'आयारामां'ना तिकीट; निष्ठावंत आक्रमक, नेत्यांना विचारला खरमरीत जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:52 IST2026-01-01T18:52:11+5:302026-01-01T18:52:48+5:30
Amravati : एबी फॉर्म वाटपावरून घमासान, प्रभाग ११ व १२ मध्ये काँग्रेसजनांना उमेदवारी दिल्याचा आरोप

Ticket for 'outsider' in BJP; Loyal and aggressive, leaders asked for a detailed answer
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाजपत महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून निष्ठावंतांमध्ये प्रचंड खदखद उफाळून आली. भाजपशी काहीही संबंध नाही, अशांना उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक नेत्यांविरुद्ध प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १:३० च्या सुमारास राजापेठ झोन-२ कार्यालय परिसरात भाजप निष्ठावंतांनी नेत्यांना घेराव करून जाब विचारला, हे विशेष.
भाजपने प्रभाग ११ रुक्मिणीनगर-फ्रेजरपुरा व प्रभाग १२ स्वामी विवेकानंद कॉलनीमध्ये तिकीट वाटप करताना 'आयारामां'ना प्राधान्य दिले, असा आरोप शक्ती महाराज यांनी केला. जी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करते, हिंदुत्वाला कमी लेखते, त्या व्यक्तीला भाजपने पायघड्या अंथरल्या, अशी टीका संगम गुप्ता यांनी केली. भाजप निष्ठावंतांनी महापालिका निवडणूक निरीक्षक जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी यांना घेराव करीत एबी फॉर्म 'आयाराम' यांना कसा दिला, याविषयी जाब विचारला. यात कालीमाता संस्थानचे शक्ती महाराज, संगम गुप्ता, राखी गुप्ता आदी आघाडीवर होते.
भाजप अध्यक्षांच्या घरी भिकाऱ्यासमान वागणूक
मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून भाजप इच्छुकांना एबी वाटप करण्यात आले. मात्र, अनेकांना भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या बंगल्यावर दारात एबी फॉर्म घेण्याकरिता भिकाऱ्यासारखी वागणूक देण्यात आली. हा सगळा प्रकार बघून भाजपत निष्ठावंतांची काय किंमत आहे, हे दिसून आले, असेही आक्रमक होत निष्ठावंतांनी भावना व्यक्त केल्या.
निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू
भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे स्थानिक नेत्यांना जाब विचारताना काहींच्या डोळ्यात अश्रू आले. आमच्या रक्तात भाजप असताना उमेदवारी काँग्रेसचे बंडू हिवसे, राजेश शादी यांना दिली. किंबहुना नेत्यांनी उमेदवारी विकली, असा आरोप संगम गुप्ता यांनी केला. पक्ष वाढवला, प्रसंगी कारागृहात गेलो, मात्र उमेदवारी बाहेरच्यांना देण्यात आली, असे सचिन डाके म्हणाले.
सांगा, आम्ही कुठे कमी पडलो ?
भाजप नेते, मंत्री व ज्यांच्याकडे एबी फॉर्म वाटपाची जबाबदारी होती, त्यांना निष्ठावंतांनी घेरून जाब विचारला. आम्ही कुठे कमी पडलो ? तो दिवस दूर नाही जेव्हा अन्यायी नेत्यांना रस्त्यावर मारायला मागेपुढे पाहणार नाही, अशा भावना संगम गुप्ता यांनी व्यक्त केल्या.
तासभर चालला 'हायव्होल्टेज ड्रामा'
महापालिका राजापेठ झोन कार्यालय ते भाजप कार्यालय असा तासभर निष्ठावंतांचा आक्रोश वजा 'हायव्होल्टेज ड्रामा' चालला. भाजप नेत्यांनी पत्नी, भाच्याला तिकीट दिली, असा आरोप करण्यात आला. यावेळी धक्काबुकी, शिवीगाळ आणि पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आल्याचा निष्ठावंतांनी आरोप केला. हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उमेदवारी वाटपात अन्याय; भाजप कार्यकर्ते आक्रमक
नगरसेवक निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. बुधवारी सकाळपासून अमरावतीत उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. उमेदवारी वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध दर्शवला.