धक्कादायक! मित्रासमक्ष युवतीवर अत्याचार, आर्वी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 14:39 IST2022-04-28T14:34:09+5:302022-04-28T14:39:33+5:30
याप्रकरणी २७ एप्रिल रोजी दत्तापूर पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! मित्रासमक्ष युवतीवर अत्याचार, आर्वी परिसरातील घटना
अमरावती : मित्रासोबत बोलत उभ्या असलेल्या युवतीवर अतिप्रसंग करण्यात आला. ही धक्कादायक घटना जळगाव आर्वी परिसरातील धनोडी मार्गावरील कॅनलजवळ २३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या दरम्यान घडली. याप्रकरणी २७ एप्रिल रोजी दत्तापूर पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ एप्रिल रोजी दुपारी एक १७ वर्षीय युवती धनोडी रोडवरील कॅनलजवळ असलेल्या एका झाडाजवळ तिच्या मित्रासोबत बोलत उभी होती. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तेथे आला व त्याने युवतीच्या मित्राला मारहाण केली. त्यात मित्र जखमी झाला. अशातच त्या अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडील मोबाईलदेखील हिसकावला. त्यामुळे तो कुणालाही मदतीसाठी बोलावू शकला नाही. कॅनलचा हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याचा गैरफायदा घेत, त्या अनोळखी व्यक्तीने युवतीवर जबरदस्ती अतिप्रसंग केला तसेच शिवीगाळ करून धमकीदेखील दिली.
या धक्क्यातून सावरत पीडित युवतीसह तिच्या मित्राने कसेबसे घर गाठले. इभ्रतीवर घातलेला घाला आणि त्यावेळची तिची अगतिकता तिने कुटुंबातील सदस्य व त्या घटनेचा साक्षीदार असलेल्या मित्राकडे व्यक्त केली. अखेर २७ एप्रिल रोजी दुपारी युवतीने दत्तापूर पोलीस ठाण्यात येत महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे आपबीती कथन केली.
एका संशयिताला अटक
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दत्तापूर पोलिसांनी त्या परिसरात वावरणाऱ्या काही संशयितांची परेड घेतली. त्यापैकी एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशीदेखील करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असणारा एक संशयित पोलिसांची चाहुल लागताच पळून गेला. त्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कुऱ्हा परिसरातून अटक केली. आरतेश लवचंद भोसले (३२) असे या संशयिताचे नाव असल्याची माहिती दत्तापूरचे ठाणेदार राजेश राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.