'कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही ; युती धर्म पाळला नाही तर..' ; पालकमंत्री स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:48 IST2026-01-08T18:46:40+5:302026-01-08T18:48:37+5:30
Amravati : कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही. युवा स्वाभिमानशी भाजपची नैसर्गिक युती व्हावी, याकरिता भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याशी सविस्तर बोलणी झाली.

'No matter how big someone is, they are not bigger than 'Kamal'; If they do not follow the alliance religion..'; Guardian Minister spoke clearly
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही. युवा स्वाभिमानशी भाजपची नैसर्गिक युती व्हावी, याकरिता भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याशी सविस्तर बोलणी झाली. असे असताना युवा स्वाभिमानने ३२ जागांवर उमेदवार उभे केले आहे. आम्ही युती धर्म पाळला ते पाळत नसतील तर युवा स्वाभिमानशी भाजपचा संबंध राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घेतली.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा वचननामा बावनुकळे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी ते पत्रपरिषदेत बोलत होते. अमरावती मनपा निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेत युती व्हावी, यासाठी अमरावती व नागपूर येथे नेत्यांमध्ये सातत्याने प्रयत्न झाले. मात्र चर्चा, वाटाघाटीनंतरही युती होऊ शकली नाही. युवा स्वाभिमानशी युती झाली आणि रवी राणा यांना अगोदर ६ आणि नंतर ३ अशा एकूण ९ जागा सोडण्यात आल्या. शिक्कामोर्तब झाले, असे असले तरी युवा स्वाभिमानने ३५ जागांवर उमेदवार उभे केले.
साईनगर, मोरबाग या दोन्ही प्रभागांत जे काही चालले आहे, यात कोणीही संभ्रम बाळगण्याची गरज नाही. केवळ भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करतील, असे ते म्हणाले. आ. रवी राणा यांना वायएसपीला ४० जागा पाहिजे होत्या. शेवटी भाजपत विचार, ध्येय आणि संघटनेला महत्त्व आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांना निवडून आणणे हेच 'टार्गेट' असून आता घोडा मैदान समोर आहे, असा टोला त्यांनी आ. राणांचे नाव न घेता लगावला. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, आ. संजय कुटे, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, शिवराय कुळकर्णी, संजय तिरथकर, सुनील खराटे उपस्थित होते.
अमरावती विकासाची गॅरंटी; व्हिजन २०३०
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपने महापालिका निवडणुकीत वचननामा जाहीर करताना अमरावती विकासाची गॅरंटी दिली आहे. पायाभूत सुविधांसह चांगले रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा, कचरा संकलन, कायदा व सुव्यवस्था, सीसीटीव्ही सर्वलन्स, वाहतूक नियंत्रण, रेल्वे पुलाचे बांधकाम व नूतनीकरण, शासकीय जागांवर लोकाभिमुख विकास, लीजधारकांना पट्टे, पीएम आवास योजनेतून वैयक्तिक घरे, अमरावती येथे आयटी पार्क, चिखलदरा येथे चार पर्यटन पार्क आदींचा समावेश आहे.
कोण कोणाचं नाव वापरतं, हे महत्त्वाचे नाही
भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार निवडणूक आणायचे काम करायचे आहे. विरोधात कोणी काम करत असेल तर शेवटी पक्ष मोठा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपविरोधी काम करणाऱ्यांना इशारा थेट इशारा दिला आहे. भाजप विरुद्ध कुठल्याही उमेदवाराचे काम करू नये. कमळ विरुद्ध प्रचार करणारा कोणताही मोठा नेता असो ते पक्षाला आवडत नाही. आमदार रवी राणा यांनी कमळ विरोधात उमेदवार टाकायला नको होते. मात्र, त्यांनी ३५ उमेदवार टाकले. त्यामुळे आताही नैसर्गिक युती राहिली नाही.