राजकारणात नवा द्विस्ट ! 'गुप्तांची अचानक घरवापसी' उपमुख्यमंत्र्यासोबत दिसले जाहीर सभेच्या मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:48 IST2026-01-08T19:43:52+5:302026-01-08T19:48:40+5:30
Amravati : गुप्ता यांनीदेखील ना. शिंदे यांचे घरवापसीचे निमंत्रण स्वीकारून जाहीर सभेत जोरदार भाषण ठोकले.

New twist in politics! 'Gupta's sudden return home' seen with Deputy Chief Minister on stage of public meeting
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा बायपासवरून शहरात न येता बडनेरा-अमरावती मार्गावरील एका महाविद्यालयात थांबतो. जाहीर सभेपूर्वी महाविद्यालयातील एका खोलीत बंदद्वार चर्चा होते अन् चार दिवसांपूर्वी शिवसेनेला जय श्रीराम म्हणणारे माजी मंत्री जगदीश गुप्ता उपमुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेच्या मंचावर दिसतात.
राज्याप्रमाणे अमरावतीच्या राजकारणातही दररोज नवीन ट्विस्ट येत आहेत. 'त्या' बंदद्वार चर्चेत नेमकं काय झालं, शिंदे काय म्हणाले, हा राजकीय वर्तुळात खमंग चर्चेचा मेन्यू झाला आहे.
अमरावती मनपा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणारच, असा दावा दोन्ही पक्षातील नेत्यांनी केला. परंतु, जागा वाटपाचा फार्म्युला ठरला तेव्हा सेनेला कमी जागा मिळाल्या. अखेर कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणत युती तुटली. वाटाघाटी सुरू असतानाच माजी मंत्री जगदीश गुप्ता तडकाफडकी त्या आलिशान हॉटेलमधून बाहेर पडले. लगेच दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेला जय श्रीराम केला. उपमुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून निवडणूक कार्यालयातून त्यांचे फोटोही हटविण्यात आले. शिवाय अंबापेठ प्रभागात परिवर्तन पॅनलचे दोन उमेदवार गुप्ता यांनी मैदानात उतरविले. तिकडे युवा स्वाभिमान पक्षाच्या बॅनरवर जगदीश गुप्ता झळकू लागले. आता अचानक झालेल्या घरवापसीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
मंचावर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव, राज्यातील मंत्री संजय राठोड, संजय रायमुलकर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ आणि जगदीश गुप्ता यांनाच बोलण्याची संधी दिली. त्यामुळे बंदद्वार चर्चेत असं काय घडलं की गुप्तांची आहे. नेते नाराजी दूर झाली, याचीच चर्चा होत आपापल्या सोयीने राजकारण करीत असले तरी मतदार मात्र प्रचंड गोंधळात आहेत. कोण कुणाचा प्रचार करतो आहे, कुणाची युती कुणासोबत आहे, हेच कळायला मार्ग नाही.
निकालाअंती होऊ शकते एक अदृश्य युती
सध्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना सोबत नको आहे. राज्यात युती असली तरी महापालिकेत नाही, असे स्पष्टपणे भाजप नेते सांगताहेत. तर स्थानिक भाजप नेत्यांना युवा स्वाभिमानही नको, परंतु वरिष्ठ नेत्यांना मात्र ही युती हवी आहे. त्यामुळे कोण कुणाचा गेम करतो हे निकालअंती कळेलच. शिवाय एक नवी अदृश्य युती जन्माला येऊ शकते. त्याचाही उलगडा लवकरच होईल. काहीही होवो, घोडामैदान दूर नाही.