नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:12 IST2026-01-05T17:11:11+5:302026-01-05T17:12:10+5:30
Amravati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांना थेट सल्ला दिला आहे.

Navneet Rana took a jibe at Ajit Pawar for her advice; said, 'Learn to speak in a dignified manner'
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांना थेट सल्ला दिला आहे. कोणतेही वक्तव्य करताना मर्यादा ओलांडू नका, असे त्या म्हणाल्या.
राणा पुढे म्हणाल्या की, महायुतीच्या एकत्रित पाठिंब्यावर हे सरकार स्थापन झाले आहे. अशा परिस्थितीत सत्तेत राहून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे आणि गोंधळ निर्माण करणे योग्य नाही. जबाबदारीच्या पदावर असताना संयमाने आणि मर्यादेत राहून बोलणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, "जनतेसमोर चुकीचा संदेश जाऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. राजकीय मतभेद असले, तरी सभ्य भाषा आणि मर्यादा पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे. प्रचारादरम्यान त्यात भर पडण्याची शक्यता आहे.
'औकातीत राहून बोलायला शिका' राणांवर खोडके बरसले
उपमुख्यमंत्री अजित पवारांना 'मर्यादेत बोला', असा सल्ला देणाऱ्या भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादी (अजित पवार) चे प्रदेश संघटक आणि आमदार संजय खोडके यांनी जोरदार टीका केली आहे.
आ. संजय खोडके म्हणाले की, नवनीत राणा आपल्या औकातीच्या बाहेर जाऊन वक्तव्य करत आहेत. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केले होते. या विषयावर भाजप प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलेही होते; मात्र नवनीत राणा यांच्या इतकी औकात नाही, तरी त्या मध्येच बोलू लागल्या, असे ते म्हणाले.
खोडके पुढे म्हणाले की, नवनीत राणांना प्रथमच निवडून आणण्यात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांना तिकीट देऊन संसदेत पाठविले; तरीही त्या बेईमान ठरल्या. पुढेही त्या अशाच प्रकारची विधाने करत राहिल्या तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हिशोब ठेवू आणि पुढील निवडणुकीत त्या कशा जिंकतात ते पाहू, असा इशाराही संजय खोडके यांनी दिला.