सरकार आल्यास मेळघाटचा चेहरामोहरा बदलणार ! धारणीतील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:05 IST2024-11-11T11:04:14+5:302024-11-11T11:05:27+5:30
Amravati : मेळघाटचा बेटा, चिखलदरा येथे आजोळ

If the government comes, the face of Melghat will change! Testimony of Devendra Fadnavis in the campaign meeting in Dharani
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी: चिखलदरा येथील स्काय वॉक पूर्ण होणार आहे. महायुतीचे सरकार आल्यास मेळघाटचा चेहरामोहरा बदलू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मेळघाट मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार केवळराम काळे यांच्या प्रचारसभेत रविवारी ते बोलत होते. मेळघाटातील समस्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले, नेर ते खंडवा रस्ता होणार आहे. चुरणी तालुका होण्यासोबतच वनविभागाकडून गोपालकांना कोणताही त्रास होणार नाही. आदिवासींसाठी बिरसा योजनेअंतर्गत चार हजार कोटी खर्च मुंडा करून वीज, रस्ते आणि पाण्याची समस्या दूर होणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी शासन प्रयत्नशील असून, ३५ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ४० ते ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणार आहोत. त्याचप्रमाणे शेतकरी सन्मान निधीची रक्कम १२ हजारांवरून १८ हजार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना, अजित पवार गट, युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळघाटचा बेटा, चिखलदरा येथे आजोळ
नवनीत राणा आपण मेळघाटाची बेटी आहे, तर मीसुद्धा मेळघाटचा बेटा आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आजोबाचे घर चिखलदरा येथे असल्याचे सांगितले. आपण लहानपणी चिखलदरा येथे नेहमी येत होतो. त्यामुळे मीसुद्धा मेळघाटचा बेटा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.