अमरावतीला पालकमंत्र्यांनी दिली विकासाची हमी, महापौर होणार भाजपचाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:04 IST2026-01-09T19:02:17+5:302026-01-09T19:04:04+5:30
Amravati : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी अमरावती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ येणार होते. मात्र मुंबई येथे झालेल्या राजकीय घडामोडींमुळे चव्हाण यांचा दौरा रद्द झाला.

Guardian Minister assures development of Amravati, Mayor will be from BJP
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी अमरावती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ येणार होते. मात्र मुंबई येथे झालेल्या राजकीय घडामोडींमुळे चव्हाण यांचा दौरा रद्द झाला. मात्र ऐन वेळेवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरहून अमरावती गाठावे लागले आणि दसरा मैदानावरील आयोजित सभा गाजवावी लागली, हे विशेष. दरम्यान त्यांनी विकासाला मत मागताना महापौर हा भाजपचाच होणार, हे जाहीर केल्याने शर्यतीतील अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरही बरेच काही अवलंबून आहे. केंद्र व राज्यात असलेल्या भाजप सरकारच्या मदतीने ती पूर्णत्वास आणण्यासाठी महापालिकेत भाजपाची सत्ता येणे आवश्यक असल्याने शहराच्या विकासासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन ना. बावनकुळे यांनी केले.
उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती
गत काही दिवसांपासून भाजप उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. युवा स्वाभिमान उमेदवाराच्या बॅनरवर भाजप नेत्यांचे छायाचित्र असल्याचे वास्तव आहे.
सीसीटीव्ही सव्हॅलन्स
भाजप महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असून शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येईल. कोराडी येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिराप्रमाणे अमरावती येथील अंबा व एकवीरा देवी मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट वाचली.
यांची होती उपस्थिती
मंचावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, नवनीत राणा, डॉ. नितीन धांडे, आ. संजय कुटे, आ. प्रताप अडसड, आ. केवलराम काळे. जयंत डेहनकर, किरण पातुकर, रवींद्र खांडेकर, अॅड. प्रशांत देशपांडे, चेतन गांवडे, तुषार भारतीय, सुनील खराटे, चरणदास इंगोले यांच्यासह आदी उपस्थित होते.