'दादागिरी, गुंडागर्दी आणि दहशतगिरी मोडून काढणार' उपमुख्यमंत्री दादांनी अमरावतीकरांना दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:49 IST2026-01-10T18:48:11+5:302026-01-10T18:49:35+5:30
Amravati : 'ज्या गावच्या बोरी असतात, त्या गावात बाभळी असतात' त्यामुळे असं कोणी वेगळे समजण्याचे कारण नाही. समाजात एकोपा असावा, ही आपली परंपरा आहे.

Deputy Chief Minister Dada promised the people of Amravati, 'We will not tolerate Dadagiri, terrorism anymore'
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'ज्या गावच्या बोरी असतात, त्या गावात बाभळी असतात' त्यामुळे असं कोणी वेगळे समजण्याचे कारण नाही. समाजात एकोपा असावा, ही आपली परंपरा आहे. चांगले काही उभे करायला वेळ लागतो. मात्र, विध्वंस, राखरांगोळी करायला वेळ लागत नाही. तेव्हा जातीय तेढ अथवा समाजात भांडण लावण्याची कृती करीत असेल तर अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतगिरी मोडून काढणार, असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे शुक्रवारी दिला; परंतु हा इशारा कोणाला दिला, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
येथील गाडगेनगरस्थित संत गाडगेबाबा समाधी प्रांगणात अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित विश्वास मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. पवार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य उभे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मताचा अधिकार दिला. म्हणूनच शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी आपण पुढे गेले पाहिजे. सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करताना शहरांचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. मी कामाचा माणूस आहे. मला विकास करायला आवडतो. शहरात जातीय सलोखा असला पाहिजे. काही लोक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीजातीत वाद लावतात. याचा फटका गरिबांना बसतो. अमरावतीत जातीय सलोखा राहिला पाहिजे. कुणी भडकविण्यास आले तर भडकू नका. डोकी शांत ठेवा. कारण नागरिकांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. त्याकरिता आम्हाला साथ हवी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
यावेळी मंचावर आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, प्रवक्ते सूरज चव्हाण, माजी आमदार देवेंद्र भुयार, यश खोडके, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, अॅड. किशोर शेळके, प्रशांत डवरे, संतोष महात्मे, अविनाश मार्डीकर, शेख जाफर, डॉ. सुभाष गवई, मधू करवा, दीपक लोखंडे, स्वाती जावरे, रमेश ढवळे, अशोक अग्रवाल, अख्तर हुसेन, पी. टी. गावंडे, अरविंद गावंडे, आश्विन चौधरी, सुरेश भारंबे, अमृत मुथा, महेंद्र भुतडा, प्रताप देशमुख, अॅड. शोएब खान, मनोज देशमुख, अब्दुल खालीद, गजानन चहाटे, जितेंद्रसिंह ठाकूर, प्रकाश वैद्य, योगिता गिरासे, अॅड. छाया मिश्रा आदी उपस्थित होते.
दादा अधिकाऱ्यांना सांगा 'अॅक्शन' घ्या
अमरावतीत सामाजिक सलोखा आहे. सर्वधर्मीय गुण्यागोंविदाने राहतात. मात्र, काही लोक विषारी भाषा बोलतात. माजी खासदार दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करतात. समाजात वाद होतील, असे वक्तव्य केले जाते. त्यामुळे दादा अधिकाऱ्यांना सांगा अॅक्शन घ्या, असे प्रास्ताविकातून आ. सुलभा खोडके यांनी ना. अजित पवार यांच्याकडे ही मागणी आवर्जून केली.
विभागाचे ठिकाण; पण अमरावतीचा विकास नाही
राज्यात सात ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. मात्र मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकच्या तुलनेत अमरावती हे विभागीय केंद्र असताना फारसा विकास झाला नाही. विमानतळ, उद्योगधंदे, रोजगार, आयटी हब, रस्ते, पूल आदी विकास झाला नाही. त्यामुळे आमदार सुलभा खोडके यांनी सुचविलेल्या प्रस्तावानुसार येत्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली जाईल, असे ना. अजित पवार म्हणाले. रेल्वे उड्डाणपूल निर्मितीच्या १२५ कोटींच्या प्रस्तावाला बजेटमध्ये तरतूद केली जाईल.