अमरावती महापालिकेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत १७.१ टक्के मतदान, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:41 IST2026-01-15T13:40:52+5:302026-01-15T13:41:06+5:30
Amravati Municipal Corporation Election: अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. शहरातील जवाहर स्टेडियम प्रभागातील गर्ल्स हायस्कूल येथील ईव्हीएम मशीन २०मिनिटे बंद होते.

अमरावती महापालिकेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत १७.१ टक्के मतदान, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप
अमरावती - अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. शहरातील जवाहर स्टेडियम प्रभागातील गर्ल्स हायस्कूल येथील ईव्हीएम मशीन २०मिनिटे बंद होते. यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. सकाळी ७.३० वाजता मतदार मोठ्या उत्साहात जिल्हा परिषदेच्या गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर पोहोचले होते. दरम्यान, या मतदान केंद्रावरील खोली क्रमांक २ मध्ये एक मतदार मतदानासाठी आत गेला असता, ईव्हीएम सुरू होत नव्हते.
मतदान प्रक्रिया होत नसल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची काही वेळ तारांबळ उडाली. दरम्यान २० मिनिटानंतर ईव्हीएम मधील तांत्रिक अडचण सोडविण्यात मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना यश आले. तर, वडाळी येथील शाळा क्रमांक १४ या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या मतदारांना ईव्हीएमवरील चार क्रमांकाचं बटन दबत नसल्याचे लक्षात आले. यानंतर इतर पाच ते सहा जणांनी ते बटन दाबून पाहिले. अशा स्थितीत अर्धा तास मतदान प्रक्रिया खोळंबली. तर, प्रभाग क्रमांक १८ राजापेठ संत कंवरराम या प्रभागातील द्वारकानाथ अरोरा विद्यालय या मतदानकेंद्रावरील सुमारे अर्ध्या तासापासून बंद होती. त्यातील एक बटन आतमध्ये अडकून पडल्याचे समोर आले. तर, काही मतदान केंद्रावर अ, ब, क व ड या प्रमाणे मतपेट्या न लावता तो क्रम उलटा लावल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी केला. तर दुसरीकडे १५ जागा असलेल्या मुस्लिमबहुल क्षेत्रातील मतदानकेंद्रांवर लोकसभेप्रमाणेच मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत.