मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:36 IST2026-01-07T12:34:14+5:302026-01-07T12:36:26+5:30
Akola Municipal elections 2026: अकोला महापालिका निवडणुकीत मुस्लीम समुदायाची मते निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस बरोबरच एआयएमआयएमही निवडणुकीत असल्याने कोणाला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार? याचाही निकालावर परिणाम दिसणार आहे.

मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान
अकोला महापालिकेतील सर्वपक्षीय मुस्लिम नगरसेवकांचे संख्याबळ थोड्याफार अंतराने यावेळीही गेल्यावेळच्या संख्याबळाएवढेच राहण्याची अपेक्षा असली तरी, त्यामध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व कायम राहील, की असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्ष काँग्रेसला हादरा देईल, अशी जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
मनपा निवडणुकीत विविध पक्षांच्या यापूर्वी २०१७ मध्ये पार पाडलेल्या मुस्लीम उमेदवारांनी विजय मिळवत शहराच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावली होती. त्या निवडणुकीत एकूण १४ मुस्लीम नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक १० नगरसेवकांचा समावेश होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तर एआयएमआयएमचा एक आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अकोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसच्या साजिद खान पठाण यांच्या विजयामुळे अकोला शहराच्या राजकीय अवकाशातील मुस्लिम समाजाचे वाढते महत्त्व सिद्ध झाले होते; परंतु आता जिल्ह्यातील परिस्थिती शहरासह चांगलीच बदलली आहे.
नगर परिषद निवडणुकांत बदलले चित्र
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांत, जिल्ह्यात काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ने चांगली कामगिरी केली. काँग्रेसचे २०, उद्धवसेनेचे ६, तर राष्ट्रवादी (शरद पवार) चे तीन नगरसेवक निवडून आले. बाळापुरात काँग्रेसचा नगराध्यक्ष विराजमान झाला.
एआयएमआयएमचे एकट्या अकोटात पाच आणि इतर नगरपालिकांत दोन नगरसेवक विजयी झाले. या पक्षांच्या कामगिरीत मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा होता, अशी जिल्ह्यात चर्चा आहे. मुस्लिम मतदार ही कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरागत मतपेढी आहे;
जिल्ह्यातील तीन नगरपरिषदात एआयएमआयएमचा शिरकाव !
आता एआयएमआयएमने त्यामध्ये शिरकाव केल्याचे दिसू लागले आहे. अकोला शहरातही हाच ट्रेंड कायम राहिल्यास, काँग्रेसच्या मनपातील संख्याबळावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मनपा निवडणुकीत नगरपालिकांतील 3 संख्याबळाचे आकडे सर्वच राजकीय पक्षांसाठी दिशादर्शक ठरत आहेत.
मुस्लीम मतदार संघटित मतपेढी म्हणून उदयास आल्याने काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे सर्व प्रमुख पक्ष मुस्लिमबहुल प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत.
दहा प्रभागात एमआयएमचे उमेदवार
शहरातील दहा मुस्लिमबहुल प्रभागात काँग्रेस उमेदवारांच्या समोर एआयएमआयएमचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या लढतीतून नेमके काय पुढे येईल, हे निकालातच स्पष्ट होणार आहे.