"अकोल्याला आधुनिक शहर बनवणार", प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:48 IST2026-01-05T15:46:13+5:302026-01-05T15:48:10+5:30
Akola Municipal elections 2026: अकोला महापालिका निवडणुकीतील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली.

"अकोल्याला आधुनिक शहर बनवणार", प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितले?
अकोला महापालिकेत भाजपा-महायुतीला सत्ता दिल्यास अकोला शहराला राज्यातील आधुनिक, विकसित शहर म्हणून उभारण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भाजपच्या 'संकल्पनामा'चे प्रकाशन झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१७ मध्ये अकोला महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर हद्दवाढीसाठी २४३ कोटी रुपयांचा आराखडा आ. रणधीर सावरकर यांनी मनपा प्रशासनाला सोबत घेऊन तयार केला व १०० कोटींचा निधी देण्यात आला. मात्र, मध्यंतरीच्या सरकारने १४३ कोटींचा निधी रोखला. आता आपले सरकार सत्तेत असून, हा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल.
अकोल्यासाठी ११३ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर असून, ३६ हजार घरांना नवीन नळजोडणी देण्यात आली आहे. सात नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून, २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा मानस आहे. याशिवाय २२१ कोटींच्या पाणी आरक्षण योजनेलाही मंजुरी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
५२१ कोटींच्या निधीतून ४५० किमी जलवाहिनी टाकण्यात आली. भूमिगत गटार योजनेचा प्रारंभ झाला असून, ८७कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मलनि:स्सारण प्रकल्पासाठी दुसरा टप्पा म्हणून ६२९ कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येणार आहे. अकोला शहरासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
पायलट ट्रेनिंग सेंटर
विमानतळाच्या भूसंपादनासाठी २०९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यासोबतच १ हजार ८०० मीटर लांबीची धावपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ही धावपट्टी २ हजार ८०० मीटर लांबीची करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर अकोला विमानतळावर पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू केले जात आहे. एअर ट्रेनिंग सेंटरची ब्ल्यू प्रिंट तयार केली जात आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
राजेश्वर मंदिरासाठी निधी
राजराजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ११ जून रोजी आमदार रणधीर सावरकर यांनी ५० कोटींचा विकास आराखडा व तीर्थक्षेत्र दर्जासाठी भूमिका घेतली.
निधीच्या योग्य वापरासाठी भाजपच पर्याय
केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेच्या विकासासाठी लाखो कोटींचा निधी देण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) युतीचीच सत्ता आवश्यक आहे. स्वतःची घरे व खिसे भरणाऱ्यांना सत्तेपासून रोखा, अन्यथा शहराची अवस्था बकाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपलाच सत्ता द्यावी, असे आवाहन फडणवीसांनी केले.
ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव
अकोल्यात ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले असून, अत्याधुनिक सांस्कृतिक भवन लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जनता भाजी बाजार, जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी पाच एकर जागा देण्यात आली असून, येथे प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे.
डीपी रस्त्यांचे काँक्रीटीकरण
भाजपची सत्ता येताच शहरातील सर्व डीपी रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून त्यांची लांबी व रुंदी वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बचत गटातील महिलांसाठी 'उमेद मॉल' उभारण्यात येणार असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. शहरातील अतिक्रमणधारक व झोपडपट्टीधारकांना हक्काची जागा व पट्टे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मॉडेल रेल्वेस्थानक
अकोला रेल्वे स्थानकाला मॉडेल रेल्वे स्थानकाचा दर्जा देण्यात येणार असून, खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नातून गतीशक्ती कार्गो टर्मिनल सुरू होणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे अकोल्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
कोटी रेल्वे उड्डाणपूलासाठी
न्यू तापडिया नगर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचा मुद्दा मांडताना या उड्डाणपुलासाठी ३७ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे आमदार सावरकर यांनी निदर्शनास आणून दिले. हा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.