सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:22 IST2026-01-07T09:49:08+5:302026-01-07T10:22:04+5:30
सत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपने एमआयएमसोबत आघाडी केली आहे.

सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
Akot BJP MIM Alliance: राजकारणात स्थानिक प्रश्न आणि विकास साध्य करण्यासाठी कधीकधी विचारधारेपेक्षा गणितांना महत्त्व दिले जाते, याचाच प्रत्यय अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत पाहायला मिळत आहे. अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने एक अनोखा राजकीय प्रयोग केला असून, चक्क एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क एमआयएमसोबत आघाडी केल्याने राज्यभरात जोरदार चर्चा सुरु झालीय.
अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांवर निवडणुका पार पडल्या. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून, भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावले आहे. मात्र, सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्याने शहर विकासाची चक्रे थांबू नयेत, या उद्देशाने भाजपने सर्वसमावेशक अकोट विकास मंच आघाडी तयार केली आहे. या आघाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात भाजपसोबत एमआयएमच्या ५ सदस्यांचा, प्रहारच्या ३ सदस्यांचा, ठाकरे गटाच्या २ सदस्यांचा, शिंदे गटाच्या १ सदस्याचा, अजित पवार गटाच्या २ सदस्यांचा, शरद पवार गटाच्या २ सदस्यांचा समावेश आहे.
या सर्व पक्षांना एकत्र आणल्यामुळे सत्ताधारी गटाची सदस्य संख्या आता २५ वर पोहोचली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, भाजपचे आमदार रवी ठाकूर यांची या आघाडीचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
भाजपचा व्हिप
अकोट विकास मंचात सहभागी असलेल्या सर्व पक्षांच्या नगरसेवकांना आता गटनेते रवी ठाकूर यांचा म्हणजेच भाजपचा व्हिप पाळावा लागणार आहे. यामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल आणि कोणत्याही निर्णयावर सर्वसंमती मिळवणे सोपे होणार आहे. आगामी १३ जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी आपली ताकद दाखवून देणार आहे.
काँग्रेस आणि वंचित विरोधी बाकावर
या सर्वसमावेशक आघाडीमुळे अकोट नगरपालिकेत विरोधी पक्षही आक्रमक आहे. काँग्रेसचे ६ आणि वंचित बहुजन आघाडीचे २ सदस्य आता विरोधी बाकावर बसणार आहेत. भाजपने घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वच स्तरांतील पक्षांना सत्तेत वाटा मिळाला आहे.
'अकोट पॅटर्न'ची सर्वत्र चर्चा
एकीकडे राज्याच्या राजकारणात पक्ष एकमेकांसमोर उभे असताना, अकोटमध्ये मात्र विकासाच्या मुद्द्यावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार आणि एमआयएम हे सर्वच वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकाच छताखाली आले आहेत. अंबरनाथमध्येही भाजपने स्थानिक समीकरणे जुळवत काँग्रेससोबत अशाच प्रकारची हातमिळवणी केली आहे.