महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:37 IST2025-12-25T10:33:09+5:302025-12-25T10:37:24+5:30
Akola Municipal Election: अकोला महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष मतांचे गणित जुळवताना दिसत आहे. काँग्रेस वंचितला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे, पण काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत एमआयएमने केलेल्या कामगिरीने काँग्रेसची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.

महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
- मनोज भिवगडे, अकोला
असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत राज्यभरात एका नगराध्यक्षासह ८३ जागांवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. यामध्ये ६७ हून अधिक जागांवर 'एमआयएम'चे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर विजयी झाले आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडून आले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांत सुमारे ३० ते ४० जागांपुरता मर्यादित असलेला 'एमआयएम' पक्ष या निवडणुकीत विशेषतः विदर्भात लक्षणीयरीत्या वाढला आहे. या वाढलेल्या संख्याबळासोबतच आतापर्यतची एक अंकी मतांची टक्केवारी दुहेरी आकड्यात पोहोचसी असून, ती काँग्रेसची पारंपरिक मतांचा आधार तोडणारी ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत 'एमआयएम'चा प्रभाव वाढताना दिसत आहे. मुंबईतील काही भागांतही पक्षाचे अस्तित्व अधिक बळकट होत आहे.
अल्पसंख्याक समाजाची मते ही अनेक दशकांपासून काँग्रेसची पारंपरिक मतपेढी मानली जात होती. दलित व वंचित घटकांचाही मोठा वर्ग काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात या घटकांमध्ये काँग्रेसबाबत नाराजी वाढत असून, पर्यायाच्या शोधात मतदार 'एमआयएम'कडे वळत असल्याचे चित्र नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होत आहे. काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते खासगी चर्चामध्ये या स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत.
जागांपर्यंत ८३ मुसंडी
सध्याच्या निवडणुकांत एमआयएमने थेट नगराध्यक्षपदासह ८३ जागांपर्यंत मजल मारली आहे. कारंजा नगरपालिकेत फरिदा बानो मो. शफी पुंजानी यांच्या रूपाने प्रथमच 'एमआयएम'चा नगराध्यक्ष निवडून आला असून, अकोला जिल्ह्यात सात, बुलढाण्यात १० आणि वाशिममध्ये १८ नगरसेवकही निवडून आले आहेत. शेगाव नगरपालिकेत पक्षाचे संख्याबळ दोनवरून चारवर पोहोचले आहे.
'एमआयएम'चे बळ!
सन २०१६ मधील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत 'एमआयएम'चे ३० ते ४० नगरसेवक निवडून आल्याचा पक्षाचा दावा होता. त्या वेळी बीड, मलकापूर, अंजनगाव सुर्जी, शेगाव, दर्यापूर, आदी ठिकाणी पक्षाने मर्यादित यश मिळवले होते. अकोला महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत 'एमआयएम'चा एक नगरसेवक विजयी झाला होता.