महाविकास आघाडीतील पक्षांचा आज समझोता, जागावाटपासाठी उद्धवसेनेचे कोणते निकष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:11 IST2025-12-26T12:08:28+5:302025-12-26T12:11:29+5:30
अकोला महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील जागावाटपांचा तिढा कायम असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

महाविकास आघाडीतील पक्षांचा आज समझोता, जागावाटपासाठी उद्धवसेनेचे कोणते निकष?
अकोला महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आघाडी होण्यासाठी उद्या शुक्रवारी बैठक होण्याचे संकेत आहेत. काँग्रेसच्या राज्य निवड समितीची बैठक आटोपल्यानंतर आता उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी एकत्रित बसून जागावाटपाचा निर्णय घेणार आहेत.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाचा आढावा सादर केला. तसेच स्थानिक स्तरावर आघाडीचा निर्णय करण्यासाठी पदाधिकारी आता घटकपक्षांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच पक्षांची उद्या शुक्रवारी बैठक बोलावण्यात येत आहे, असे पक्षाचे समन्वयक प्रकाश तायडे यांनी सांगितले.
उद्धवसेनेची तयारी
संभाव्य प्रभाग आणि नगरसेवकांच्या जागांचा आराखडा पक्षाकडे तयार आहे. त्यानुसार ज्यांची विजयाची शक्यता अधिक, स्थानिक समीकरण यासह इतरही निकषांचा विचार करून जागा वाटपाची चर्चा होईल, अशी भूमिका असल्याचे उद्धवसेना पश्चिम शहरप्रमुख आशिष गावंडे यांनी सांगितले.