विधानसभा निवडणूक; अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मागणीला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:53 IST2019-08-10T13:53:30+5:302019-08-10T13:53:39+5:30
अकोट मतदारसंघात दिलेल्या आमदाराने काहीच केले नसल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.

विधानसभा निवडणूक; अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मागणीला जोर
अकोट : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी ९ आॅगस्ट रोजी झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आली.
अकोट मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, या मागणीकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी दुपारी पार पडली. या बैठकीत अनेकांनी विचार मांडताना, कार्यकर्ते पक्षाला काहीच मागत नाहीत, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून देतो. भाजपात कार्यकर्ताच मोठा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात; पण पक्षाने अकोट मतदारसंघात दिलेल्या आमदाराने काहीच केले नसल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. स्थानिक उमेदवार असला तर आपुलकी, प्रेम राहते. आपण हक्काने बोलू शकतो. भाजपा शासन खूप निधी देते; मात्र बाहेरचा उमेदवार विकासाबाबत अनुकूल दिसत नसल्याचे कार्यकर्त्यांनी बैठकीत सांगितले. अकोट मतदारसंघात भाजपाकडे एकही उमेदवार नाही, असे वरिष्ठापर्यंत पोहोचविले जात आहे; परंतु या मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असणारे अनेक नेते आहेत. त्यामुळेच यावेळी स्थानिक नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बुथ प्रमुख, कार्यकर्ता यांच्या बैठकीत एक निवेदन तयार करण्यात आले. सदर निवेदन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्याचे ठरले. या निवेदनात स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्यासह इतर मागण्या करण्यात येणार आहेत.