लोकसभा निवडणूक 2024: कोण-कोण घेणार माघार?; अकोल्यातील लढत सोमवारी ठरणार!
By संतोष येलकर | Published: April 7, 2024 02:14 PM2024-04-07T14:14:59+5:302024-04-07T14:16:18+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारपर्यंत...
संतोष येलकर, अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर विहित मुदतीत कोण-कोण माघार घेणार, याबाबतचे चित्र सोमवारीच दुपारपर्यंत स्पष्ट होणार असून, त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम लढतही ठरणार आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत (४ एप्रिलपर्यंत) २८ उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले असून, उर्वरित १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांच्या अर्जांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याअनुषंगाने विहित मुदतीत कोण-कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण-कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबतचे चित्र सोमवारी दुपारनंतर स्पष्ट होणार असून, त्यामध्ये मतदारसंघातील उमेदवारांची अंतिम लढतही ठरणार आहे.
राजकीय पक्षांचे ९; अपक्षांचे ८ अर्ज!
उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले असून, १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे ९ आणि ८ अपक्ष उमेदवारांच्या अर्जांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने विहित कालावधीत कोण-कोण अर्ज मागे घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.