औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:28 IST2025-12-27T10:26:08+5:302025-12-27T10:28:55+5:30
अकोला महापालिका निवडणूक २०२६: संबंधित या भेटीनंतर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय होणार आहे.

औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
- सचिन राऊत, अकोला
भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या काही पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून शहरात भाजपविरोधात 'तिसरी आघाडी' उभारण्याची तयारी सुरू होती. मात्र, राजकारणातील चाल नेहमी दोन पावले पुढची असते, हे दाखवून देत भाजपने हा प्रयोग प्रत्यक्षात येण्याआधीच उधळून लावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे तिसरी आघाडी निर्मितीची चर्चा औटघटकेची ठरली आहे.
भाजपने निलंबित आणि बंडखोर नेत्यांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'घरवापसीचा डाव' आखला असून, त्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र आहे.
यामध्ये माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी, अॅड. गिरीश गोखले, डॉ. अशोक ओळंबे हे प्रमुख चेहरे असून, आशिष पवित्रकार यांचीही घरवापसी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, यांतील अॅड. गिरीश गोखले यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये घरवापसी केल्याची माहिती आहे.
बावनकुळे यांची भेट, समीकरणे बदलली
विधानसभा निवडणुकीदरम्यान बंडखोरी केल्याने हरीश अलीमचंदानी आणि डॉ. अशोक ओळंबे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून आशिष पवित्रकार आणि गिरीश गोखले यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते.
या कारवाईनंतरच या नेत्यांच्या पुढाकारातून 'तिसरी आघाडी' उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. दरम्यान, या सर्व घडामोडींत चारही पदाधिकाऱ्यांनी नुकतीच नागपूर येथे प्रदेश भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
मध्यस्थी केली असून, संबंधित या भेटीनंतर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय होणार असून, त्यांची भाजपमध्ये अधिकृत घरवापसी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्यांना निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपच्या हस्तक्षेपाने फुगा फुटला!
भाजपविरोधी राजकारणासाठी पर्याय उभे करण्याचा प्रयत्न सुरू होता. पक्षाने योग्य वेळी हस्तक्षेप करून नाराज नेत्यांना संवादाच्या माध्यमातून परत आणल्याने तिसरी आघाडी स्थापन होण्याआधीच तिचा फुगा फुटला, अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात आहे.