मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:16 IST2026-01-14T19:13:25+5:302026-01-14T19:16:28+5:30
Akola Municipal Election 2026: २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. यंदा काँग्रेसच्या चार उमेदवारांसमोर एमआयएमचे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
- नितीन गव्हाळे, अकोला
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना एमआयएमच्या उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ८ पैकी ६ प्रभागांमध्ये सहज विजय मिळविला होता, हे सर्व प्रभाग काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जातात. यंदा या बालेकिल्ल्यात एमआयएमने चारही जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. यंदा काँग्रेसच्या चार उमेदवारांसमोर एमआयएमचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, 'ब' गटात एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. प्रभाग क्रमांक २ मध्येही मागील निवडणुकीत काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला होता. यंदा मात्र काँग्रेसच्या चारही उमेदवारांसमोर एमआयएमचे चार उमेदवार तसेच वंचित, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि उद्धवसेना यांचेही आव्हान आहे.
शिंदेसेना चारही जागा राखणार?
प्रभाग क्रमांक १७ मध्ये गत निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेने चारही जागा जिंकल्या होत्या. यंदा तेच उमेदवार शिंदेसेनेकडून रिंगणात उतरले असून, त्यांना भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस आणि एमआयएमचे आव्हान आणि मतविभाजन होण्याचा धोका असल्याने, शिंदेसेनेसाठी चारही जागा राखणे आव्हानात्मक ठरणार आहे.
एमआयएमचे आव्हान असलेले प्रभाग
प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे चार, एमआयएमचे तीन, प्रभाग क्रमांक २ मध्ये काँग्रेस, एमआयएमचे प्रत्येकी चार, प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँग्रेस, एमआयएमचे प्रत्येकी तीन, प्रभाग क्रमांक ८, ९, ११, १७ आणि १८ मध्ये काँग्रेस, एमआयएमचे प्रत्येकी चार उमेदवार आमने-सामने असल्याने, चुरस निर्माण झाली आहे.
शहरातील प्रभाग ७ मध्ये चुरशीची लढत
प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँग्रेसच्या तीन जागा निवडून आल्या होत्या. यंदा काँग्रेससमोर तीन जागांवर एमआयएमचे, तर चार जागांवर महानगर विकास समितीसह वंचित आणि शिंदेसेनेचे आव्हान आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये मागील निवडणुकीत काँग्रेसच्या तीन जागा आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.
यंदा काँग्रेसच्या चारही 3 उमेदवारांसमोर एमआयएमचे चार, राष्ट्रवादी (अजित पवार) चे दोन, शिंदेसेनेचे दोन आणि उद्धवसेनेचा एक उमेदवार रिंगणात उतरल्याने येथेही बहुकोनी लढत पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये २०१७३ मध्ये काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला होता. यंदा काँग्रेसने चार जागांवर उमेदवार दिले असून, याठिकाणी एमआयएमने तीन उमेदवार उभे केल्याने येथेही चुरशीची लढत रंगली आहे.