भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
By सचिन राऊत | Updated: December 31, 2025 17:20 IST2025-12-31T17:19:31+5:302025-12-31T17:20:45+5:30
Akola Municipal election 2026: २०१७ मधील निवडणुकीत विजयी झालेल्या ४८ माजी नगरसेवकांपैकी २७ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
- सचिन राऊत, अकोला
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी सभापतींसह अनेक दिग्गजांना डच्चू देत एकूण उमेदवारांच्या ४० टक्के नवे चेहरे रिंगणात उतरविले आहेत. २०१७ मधील निवडणुकीत विजयी झालेल्या ४८ माजी नगरसेवकांपैकी २७ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ११ माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांना तर २४ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
माजी महापौर सुमन श्रीराम गावंडे यांचे तिकीट कापण्यात आल्याने, हा बदल लक्षवेधी ठरला आहे. त्यांच्या जागी सोनाली अंधारे, माजी उपमहापौर राजेंद्र गिरी यांच्या जागी हर्षद प्रमोद भांबरे, तर सतीश ढगे यांना डावलत नितीन ताकवाले यांना उमेदवारी देण्यात आली.
विजय इंगळे यांच्या जागी मंगेश झिने, तर दीप मनवानी यांच्याऐवजी हरिश आलिमचंदानी यांना प्रभाग १५ मधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर कल्पना गोटफोडे यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच पवन महल्ले यांना संधी मिळाली.
नंदा पाटील यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर राजेश्वर धोटे, सुजाता अहिर यांच्याऐवजी विशाल इंगळे, तर आशिष पवित्रकार यांच्याऐवजी प्राची नीलेश काकड, अनुराधा नावकार यांच्या जागेवर शिल्पा किशोर वरोकार यांना उमेदवारी दिली आहे.
दोन्ही सेनेच्या दोघांना उमेदवारी
दरम्यान, उद्धवसेनेचे माजी नगरसेवक शरद तूरकर व माजी नगरसेविका मंजूषा शेळके यांना भाजपमध्ये प्रवेश देत थेट उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला जागा सोडण्यात आल्या आहेत.
भाजपचा गुजरात पॅटर्न
भाजपने यावेळी 'गुजरात पॅटर्न' अवलंबत उमेदवारी वाटपात मोठा बदल केला आहे. यावेळी निवडणुकीत ४० टक्के नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली असून, जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सर्वेक्षणाच्या आधारे तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ४० टक्के जागांवर नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली.
उमेदवार यादीत ११ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती, १८ नामाप्र आणि ३२ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये २८ महिला, ३४ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.
काहींच्या प्रभागांमध्ये बदल
हरीश अलीमचंदानी यांना प्रभाग १२ ऐवजी प्रभाग १५ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. संजय बडोणे यांना प्रभाग १९ ऐवजी प्रभाग १६ मधून, तर विशाल इंगळे यांना प्रभाग १३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या बदलांमुळे अंतर्गत राजकारण तापल्याचे चित्र आहे.
नेत्यांचे कुटुंबीय, नातेवाईकांना संधी
माजी नगरसेवक राहुल देशमुख यांच्या पत्नी निकीता देशमुख, बबलू उर्फ महादेव जगताप यांची मुलगी नितू जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. सुभाष खंडारे यांच्या जागी त्यांची पत्नी विद्या खंडारे, आम्रपाली उपर्वट यांच्या जागी पती सिद्धार्थ उपर्वट, तसेच दिवंगत सुनील क्षीरसागर यांच्या पत्नी माधुरी क्षीरसागर, संतोष शेगोकार यांचे निधन झाल्याने त्यांचे बंधू संदीप शेगोकार यांना तर हरीश काळे यांच्या जागी त्यांची वहिनी शशिकला काळे यांना संधी देण्यात आली.
जयश्री दुबे यांच्या जागेवर त्यांचे 3 बंधू दिलीप मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गीतांजली शेगोकार यांच्या जागेवर त्यांचे पुत्र सागर शेगोकार यांना उमेदवारी देण्यात आली. जयंत मसने यांना त्यांच्या पत्नीच्या जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे. जानवी डोंगरे यांच्या जागेवर त्यांचे पती संतोष डोंगरे यांना उमेदवारी दिली. गजानन सोनोने यांना त्यांच्या पत्नीच्या जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे.