रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न

By Atul.jaiswal | Published: September 7, 2021 11:25 AM2021-09-07T11:25:21+5:302021-09-07T11:29:03+5:30

Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity : निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे.

Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity | रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न

रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न

googlenewsNext
ठळक मुद्देमहु-सनावद गेज परिवर्तनाचा निधी वळविण्याची मागणी इंदूरच्या खासदारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

- अतुल जयस्वाल

अकोला : उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात सरळ व कमी अंतराचा रतलाम-खंडवा- अकोला-नांदेड मार्गे हैदराबाद हा रेल्वे कॉरिडाॅर पूर्णत्वास जाण्याच्या मार्गात आधीच अकोट ते आमलाखुर्द दरम्यानच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा अडथळा असताना, आता आणखी एक नवे विघ्न समोर आले आहे. या लोहमार्गातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महु ते सनावद दरम्यानच्या गेज परिवर्तनासाठी मंजूर झालेला निधी इंदूर-दाहोद रेल्वेलाइनसाठी वळविण्याची मागणी इंदूरचे खासदार शंकर लालवाणी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ३० ऑगस्ट रोजी पाठविलेल्या एका पत्राद्वारे केली आहे. हा निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम ते अकोला या ४७२ किमी लांबीच्या मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये हिरवी झेंडी दिली होती. या प्रकल्पात आतापर्यंत रतलाम ते महु, सनावद ते खंडवा व अकोट ते अकोलापर्यंतच्या टप्प्यांचे गेज परिवर्तन झाले असून, महु ते सनावद या ५४ किमी टप्प्याचे गेज परिवर्तन अद्याप बाकी आहे. या कामासाठी ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे काम बंद असल्यामुळे या कामासाठी मंजूर असलेल्या निधीपैकी १५० कोटींचा निधी इंदूर ते दाहोद या रेल्वे लाईनसाठी वळता करावा, अशी मागणी करणारे पत्र इंदूरचे भाजप खासदार शंकर लालवाणी यांनी ३० ऑगस्ट रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले आहे. हे काम आणखी दोन वर्षे सुरु होण्याची शक्यता नसल्याचा तर्क त्यांनी दिला आहे. दिल्ली दरबारात राजकीय वजन असलेल्या लालवाणी यांची मागणी मंजूर होऊन निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो.

व्याघ्र प्रकल्पामुळे अकोट ते अमला खुर्द काम ठप्प

रतलाल - खंडवा - अकोला लोहमार्गाचे बहुतांश गेज परिवर्तन झाले असून, अकोट ते अमला खुर्दपर्यंतचे ७७ किमी गेज परिवर्तनाचे काम रखडलेले आहे. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे गेज परिवर्तनाचे काम बाहेरून वळते करावे, अशी याचिका पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्य शासनानेही मेळघाटातून ब्रॉडगेजचे काम होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी हे काम मार्गी लागण्याची शक्यता नाही.

 

खंडवा ते अमला खुर्द काम सुरु

गेज परिवर्तन प्रकल्पात अकोट ते अमला खुर्द काम ठप्प असले तरी खंडवा ते अमला खुर्दपर्यंतच्या ५३ किमी मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. गिरहीपर्यंत पूल व इतर कामे झालेली आहेत. त्यामुळे गेज परिवर्तनाचे काम मेळघाटामधूनच जाईल अशी आशा या मार्गाच्या समर्थकांमध्ये अजूनही जागृत आहे.

Web Title: Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.