जरांगे फॅक्टरमुळे पक्षाला फटका बसला! खा.डाॅ.भागवत कराड यांची कबुली
By आशीष गावंडे | Updated: June 20, 2024 19:47 IST2024-06-20T19:47:12+5:302024-06-20T19:47:33+5:30
लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने राज्यातील ४८ लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे

जरांगे फॅक्टरमुळे पक्षाला फटका बसला! खा.डाॅ.भागवत कराड यांची कबुली
अकाेला: मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनाेज जरांगे पाटील यांच्या आंदाेलनामुळे मराठवाड्यात भाजपला नुकसान झाल्याचे माजी केंद्रिय राज्यमंत्री तथा खासदार डाॅ.भागवत कराड यांनी सांगितले. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता जरांगे यांनी केलेल्या सगेसाेयरे बाबतच्या मुद्यावर राज्य शासन सकारात्मक ताेडगा काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डाॅ.कराड यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने राज्यातील ४८ लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे. त्या अनुषंगाने माजी केंद्रिय राज्यमंत्री तथा खासदार डाॅ.भागवत कराड यांनी गुरुवारी पक्षाच्या काेअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांसाेबत संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते. लाेकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजप संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केला. प्रत्येक महिलेला वर्षाकाठी एक लाख रुपये देण्याचे आश्वासन जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे डाॅ.कराड यांनी सांगितले. विराेधकांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केल्याने महायुतीला जागा कमी मिळाल्या. यावर मंथन केल्या जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनाेज जरांगे पाटील यांनी आंदाेलन सुरु केले. या आंदाेलनाचा परिणाम मराठवाड्यात दिसून आला. जरांगे फॅक्टरमुळे भाजपला काही ठिकाणी नुकसान सहन करावे लागले. आरक्षणाचा मुद्दा राज्य शासन सामाेपचाराने हाताळत असल्याचे डाॅ. कराड यांनी सांगितले. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गिरीश जोशी उपस्थित हाेते.
पडद्याआडून काम करणाऱ्यांवर कारवाई
सन २०१९ मधील निवडणुकीत संजय धाेत्रे यांना ५ लक्ष ५४ हजार ४४४ मते मिळाली हाेती. ते तब्बल २ लक्ष ७५ हजार ५९६ मतांच्या फरकाने निवडून आले हाेते. यंदाच्या निवडणुकीत अनुप धाेत्रे ४ लक्ष ५७ हजार ३० मते मिळाली. ते ४० हजार ६२६ मतांनी विजयी झाले. ही माेठी तफावत असल्याचे सांगत डाॅ.कराड यांनी पडद्याआडून काम करणाऱ्यांवर कारवाइ हाेणार असल्याचे सांगितले.