Akola Election: मतदानाची टक्केवारी ६० पार जाणार का? निवडणुकीत मतदानाबाबत उदासीनतेचेच चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:03 IST2026-01-14T20:01:05+5:302026-01-14T20:03:17+5:30
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे.

Akola Election: मतदानाची टक्केवारी ६० पार जाणार का? निवडणुकीत मतदानाबाबत उदासीनतेचेच चित्र
अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी समाधानकारक नसल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. सरासरी सुमारे ४० टक्के मतदार मतदानासाठी घराबाहेरच पडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत तरी मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांचा टप्पा ओलांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांचा आढावा घेतला असता मतदानाचा आलेख सातत्याने मर्यादित राहिल्याचे दिसून येते. सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत केवळ ५५.९२ टक्के मतदान झाले होते.
महापालिका स्थापनेपासून आजवर झालेल्या एकाही निवडणुकीत एकदाही ६० टक्क्यांचा आकडा गाठता आलेला नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मतदारांचा कल कमी असल्याचे स्पष्ट होते. विशेषतः महिला व तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत अपेक्षित उत्साह दिसून येत नाही.
उपक्रमाचा फायदा होईल का?
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मतदार जनजागृती मोहिमा, सोशल मीडिया प्रचार, मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधा वाढविणे तसेच मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत; मात्र या सर्व प्रयत्नांचा प्रत्यक्ष परिणाम मतदानाच्या दिवशीच दिसून येणार आहे.
सन २०१७ च्या निवडणुकीत ४,७७, ३७२ एवढे मतदार होते. त्यापैकी ५५.९२ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत २,७४,८७७ पुरुष व २,७५,१४२ महिला व ४१ इतर मिळून ५,५०,०६० मतदार आहेत. त्यापैकी आता किती जागरूक मतदार मतदान करतील यावर टक्केवारी अवलंबन आहे.