Not a big opposition leader; If the 'anti-party leader' | 'राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते नाहीत, ते तर 'पक्षविरोधी नेते''
'राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते नाहीत, ते तर 'पक्षविरोधी नेते''

संगमनेर (जि. अहमदनगर) : राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते नाहीत तर ‘पक्षविरोधी नेते’ आहेत. विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर पाहिजे होते. ज्यांच्यावर कॉँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत. पक्षाला ताकद देण्याऐवजी आव्हान देण्याचे काम सुरू आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपले चिरंजीव आणि भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी राहुरी तालुक्यात ११ ठिकाणी वस्ती सभा घेऊन मोर्चेबांधणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या आयोजनासाठी भाजपाची बैठक झाली, त्यावेळी तिथेही राधाकृष्ण विखे हजर होते. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं होतं.

तसंच, विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये, असा टोला राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता लगावला होता. त्यानंतर आता पुन्हा थोरातांना विखेंना लक्ष्य केलं आहे.

संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर येथील मंदिरात बुधवारी नारळ वाढवून शिर्डी लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराला सुरवात करण्यात आली. या वेळी आयोजित विजय निर्धार सभेत आ. थोरात बोलत होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. वैभव पिचड, शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, दुर्गा तांबे, अनुराधा आदिक, आबासाहेब थोरात, महिला अध्यक्षा वैशाली राऊत आदी उपस्थित होते.


Web Title: Not a big opposition leader; If the 'anti-party leader'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.