अहिल्यानगरवर झेंडा कुणाचा?; आज मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:41 IST2026-01-15T11:41:40+5:302026-01-15T11:41:40+5:30
१७ प्रभागांसाठी ३४५ मतदान केंद्र : उद्या मतमोजणी, मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३०

अहिल्यानगरवर झेंडा कुणाचा?; आज मतदान
अहिल्यानगर: महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. १७ प्रभागांतील ३४५ मतदान केंद्रांवर सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, तब्बल ३ लाख ७ हजार मतदार आपला कौल देणार आहेत. मागील निवडणुकीत कात ६७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरीत ६३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहिल्यानगर वखार मतदान प्रक्रियेनंतर सर्व ईव्हीएम मशीन एमआयडीसीतील महामंडळाच्या गोडावूनमध्ये केलेल्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. १६ जानेवारीला सकाळी १० वाजता येथे मतमोजणी होणार आहे. १७ प्रभागांची एकाच वेळी मतमोजणी होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. मतदान प्रक्रियेसाठी १,८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ६८ मतमोजणी पर्यवेक्षक व ६८ मतमोजणी सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व मतदान केंद्रांवर मतदान
प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. केंद्रावर आरोग्य पथक, अखंड वीजपुरवठा, ज्येष्ठ, अपंगांसाठी सुविधा, पाण्याची व्यवस्था, केंद्रांवर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे व त्याचे सततचे निरीक्षक केले जाणार आहे.
ही आहेत संवेदनशील केंद्रे
प्रभाग ४ मधील जिल्हा परिषद उर्दू शाळा, दर्गा दायरा मुकुंदनगर, मौलाना आझाद उर्दू शाळा मुकुंदनगर, प्रभाग ५ मधील पेमराज सारडा कॉलेज पत्रकार चौक, राधाबाई काळे महाविद्यालय तारकपूर रोड तर प्रभाग १० मधील मनपा उर्दू व मराठी शाळा बेलदार गल्ली, नागोरी मिसगर उर्दू प्राथमिक शाळा बेलदार गल्ली, सीताराम सारडा शाळा, बागडपट्टी, ही संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली असून, या केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे.
एक पिंक दोन मॉडेल केंद्र
गावडे मळा येथील साई इंग्लिश मीडियम स्कूल येथे पिंक मतदान केंद्र राहणार आहे. तर सावेडी गाव व रेल्वे स्टेशन येथील शाळेत मॉडेल मतदान केंद्र असणार आहेत.
प्रशासकीय यंत्रणा २ हजार पोलिसांचा बंदोबस्त. निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण १८०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे. ज्या शहरामध्ये आपण राहतो आणि जे शहर आपल्याला घडवते, त्या शहराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच लोकशाहीच्या कर्तव्याचे भान ठेवून, मतदानातून आपण शहराच्या विकासात हातभार लावायचा आहे. नव्या वर्षात आपण सर्वजण मतदानाच्या माध्यमातून शहराला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूया. मतदान केंद्रांवर आम्ही तुमची वाट पाहत आहोत. यशवंत डांगे, आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी