अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:06 IST2025-12-29T13:05:20+5:302025-12-29T13:06:47+5:30
महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत.

अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
अहिल्यानगर - ऐन महापालिका निवडणुकीत शहरात उद्धवसेनेतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी पत्नी तेजस्विनी राठोड यांची अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. याचवेळी सोशल मीडियावर पक्षाला माझी गरज राहिली नाही अशी भावनिक पोस्ट करत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने शहरातील उद्धवसेनेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे उद्धवसेनेत राठोड आणि काळे असे दोन गट स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. राठोड घराण्याचे शहरातील शिवसेनेच्या जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे. विक्रम राठोड यांचे वडील अनिल राठोड यांनी तब्बल ४० वर्ष शहरात शिवसेना रुजवण्याचे काम केले आणि ते २५ वर्ष आमदार होते.
२०१८ पर्यंत महापालिकेच्या सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या गेल्या असून प्रत्येकवेळी इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून येत होते. राज्यस्तरावर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद शहरातही उमटले. एकसंघ शिवसेनेचे दोन भाग झाले आणि बहुतांश आजी-माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेची वाट धरली. मात्र, विक्रम राठोड यांनी उद्धवसेनेशी निष्ठा कायम ठेवली होती. असे असताना राठोड यांनी ऐन निवडणुकीत अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याने उद्धवसेनेतील स्थानिक पातळीवरील मतभेद टोकाला गेल्याचे संकेत मिळत आहेत. सेनेतील पदाधिकारी हे डॅमेज कंट्रोल कसे करणार याची चर्चा रंगली आहे.
दिवंगत अनिल राठोड यांनी नगर शहरात शिवसेना मोठी केली. भैया यांच्यानंतरही आम्ही पक्षाचे एकनिष्ठेने काम केले. पक्षफुटीनंतरही आम्ही पक्षांतर केले नाही. आज मात्र, महापालिका निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही. शहरप्रमुखांनी मला पत्र पाठवून उमेदवारी हवी असेल तर अर्ज करा असे सांगितले. पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह, वरिष्ठांबाबतही नाराजी आहे. पक्षात राहून आमच्यावर जर अशी वेळ येत असेल तर अपक्ष लढणे हाच आमच्यासमोर पर्याय आहे - विक्रम राठोड, राज्य सहसचिव युवासेना
दिवंगत अनिल राठोड आमचं दैवत आहेत. त्यांचे सुपुत्र विक्रम यांच्यावर शिवसैनिकांचे प्रेम आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय का घेतला हे समजत नाही. मी व्यक्तिशः त्यांना अनेकवेळा भेटण्याचा प्रयत्न केला. मुलाखतींसाठी आम्ही त्यांना आमंत्रित केले होते. परंतु ते आले नाहीत. त्यांनी उमेदवारीसाठी शिफारस केलेल्या बहुतांश लोकांना पक्ष उमेदवारी देखील देत आहे. उमेदवारीसाठी त्यांना कोणीही पक्षाकडे अर्ज करा असे कधीही म्हटलेले नाही. राठोड अथवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कुणी पक्षाकडून उमेदवारी करावी यासाठी त्यांची आम्ही मनधरणी केली आहे - किरण काळे, महानगर प्रमुख, उद्धवसेना