अहमदनगरमध्ये उद्या मतदान : १८ लाख मतदार बजावणार हक्क, २०३० केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 18:43 IST2019-04-22T18:41:41+5:302019-04-22T18:43:51+5:30
अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (मंगळवार) १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अहमदनगरमध्ये उद्या मतदान : १८ लाख मतदार बजावणार हक्क, २०३० केंद्र
अहमदनगर: अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (मंगळवार) १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण २०३० केंद्रांवर मतदान होणार आहे. भाजपचे डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सकाळी ७ ते सायंकाळी ६ ही मतदानाची वेळ असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील २०३० मतदान केंद्रांवर १८ लाख ५४ हजार २४८ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) सोमवारी मतदान साहित्यासह रवाना करण्यात आले. निवडणुकीसाठी ४ हजार २६३ बॅलेट युनिट, २ हजार ४३६ कंट्रोल युनिट व २ हजार ६३९ व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह मुख्य निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन, पोलीस विभागासाठीच्या निवडणूक निरीक्षक भवानीश्वरी यांनीही मतदान साहित्य वाटपाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वाटप करण्यात आलेले साहित्य आणि मतदान यंत्रे घेऊन पुरेशा बंदोबस्तात संबंधित पथकांना मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. या मतदारसंघात एकूण १८ सखी मतदान केंद्र असणार आहेत. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत.
मतदानाच्या दिवशी औद्योगिक आस्थापनांना सुटी
मतदानाच्या दिवशी लोकसभा मतदारसंघातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापारी आस्थापना, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे आदेशित केले आहे.