सावेडी, मध्य भागातील प्रभागांवरच अडकली महायुती; प्रभाग बारामध्ये रस्सीखेंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:35 IST2025-12-24T12:34:55+5:302025-12-24T12:35:14+5:30
तीन प्रभागांवरच महायुतीची चर्चा अडकली

सावेडी, मध्य भागातील प्रभागांवरच अडकली महायुती; प्रभाग बारामध्ये रस्सीखेंच
अहिल्यानगर : महापालिकेची निवडणूक एकत्रित लढविण्यावर महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते. जागा वाटपाची चर्चेची पहिली फेरी मंगळवारी शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत पार पडली. सावेडीतील प्रभाग क्रमांक एक व दोन आणि माळीवाड्यातील प्रभाग बारा, या तीन प्रभागांवरच महायुतीची चर्चा अडकली असल्याचे तिन्ही पक्षांच्या गोटातून सांगण्यात आले.
महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. महापालिकांमध्ये महायुती करण्याची घोषणा तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. अहिल्यानगर महापालिकेत महायुती करण्याचे तिन्ही पक्षांना आदेश आहेत. परंतु, तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक अद्याप झालेली नव्हती. तिन्ही पक्षांनी जागा वाटपाच्या चर्चेसाठी चार जणांची समिती नेमली आहे. त्यांचीही एकत्रित बैठक झालेली नव्हती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने गुप्त बैठकांना वेग आला आहे. भाजपचे प्रदेश संघटक रवींद्र अनासपुरे हे सोमवारी नगरमध्ये मुक्कामी होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी दुपारी सावेडीतील एका हॉटेलमध हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यानंतर तिथेच महायुतीतील तिन्ही पक्षांची बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. सावेडीतील प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये अजित पवार गटाचे वर्चस्व आहे.
त्यामुळे अजित पवार गटाने या दोन प्रभागांतील आठ जागांवर दावा ठोकला आहे. सर्व जागा राष्ट्रवादीला गेल्यास तिथे भाजपच्या इच्छुकांना संधी मिळणार नाही. सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादीलाच का सोडायच्या?, असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जावू शकतो. त्यानंतर माळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये शिंदे सेनेचा प्रभाव आहे. या प्रभागातील सर्व जागांवर शिंदेसेनेने दावा ठोकला आहे. तिथे राष्ट्रवादीचेही वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जागेची मागणी होऊ शकते. सध्या तरी या तीन प्रभागांच्या जागांवरून महायुतीची चर्चा अडकली आहे. चर्चेच्या दुसऱ्या सऱ्या फेरीत कुणाची ताकद कुठे आहे, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोतकर समर्थकांमुळे भाजपची अडचण
केडगाव उपनगरातील कोतकर समर्थक गेल्यावेळी भाजपकडून लढले होते. त्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता. याहीवेळी कोतकर समर्थकांनी भाजपकडे मुलाखती दिल्या. पण, उमेदवारी जाहीर होण्याआधीच कोतकर समर्थकांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडला आहे. ते भाजपकडून लढणार की शहर विकास आघाडी करून, हे अजून स्पष्ट झालेले नाही. कोतकर समर्थकांना जागा दिल्यास तिथे भाजपमध्येच बंडखोरी होण्याची शक्यता आहे.