Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:03 IST2026-01-01T16:42:16+5:302026-01-01T17:03:07+5:30
Ahilyanagar Municipal Election Result 2026: अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Ahilyanagar Municipal Election 2026 Winners: राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच काही जागांवरील निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले असून, पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्र. ८ मधून कुमार वाकळे तर प्रभाग क्र. १४ मधून प्रकाश भागानगरे यांनी विजयाची गुलाल उधळला आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीची विजयी सलामी
अहिल्यानगरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) विजयाचे खाते अत्यंत नाट्यमयरीत्या उघडले. प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये कुमार वाकळे यांच्या विरोधात केवळ अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा अर्ज वैध ठरला होता. मात्र, कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वाकळे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर प्रभाग १४ मधून प्रकाश भागानगरे यांचीही बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वीच दोन जागा खिशात घातल्या आहेत.
शिंदेसेनेचे बुरुज ढासळले; ५ अर्ज बाद
एककीकडे राष्ट्रवादी जल्लोष करत असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अहिल्यानगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक ५४ जागांवर उमेदवारी देणाऱ्या शिंदेसेनेच्या ५ उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरले आहेत. तांत्रिक कारणांमुळे पक्षीय अर्ज बाद झाल्याने आता शिवसेनेचे केवळ ४९ उमेदवार मैदानात उरले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्यांचे पक्षीय अर्ज बाद झाले आहेत, त्यांचे अपक्ष म्हणून भरलेले अर्ज ग्राह्य धरले जातील, मात्र यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.
राज्यातील बिनविरोध चित्र
अहिल्यानगरच्या दोन जागांसह राज्यातील एकूण ८ उमेदवार आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहेत. भाजपचे सहा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन तर शिंदेसेनेचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. राज्यातील इतर ठिकाणची आकडेवारी पाहता महायुतीचे पारडे जड दिसत आहे.
२ जानेवारीकडे सर्वांचे लक्ष
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ६८ जागांसाठी एकूण ७८८ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १७ अर्ज अवैध ठरले आहेत. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज माघारी घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. या काळात आणखी किती उमेदवार माघार घेतात आणि कोणामध्ये थेट लढत रंगते, यावर अहिल्यानगरचे अंतिम राजकीय समीकरण अवलंबून असेल.