अहिल्यानगर शहरामध्ये भाजप-राष्ट्रवादीची दहशत; त्यांचे बिनविरोध, आमचे अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:01 IST2026-01-07T14:00:46+5:302026-01-07T14:01:34+5:30
आमच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले; शिंदेसेनेचा आरोप

अहिल्यानगर शहरामध्ये भाजप-राष्ट्रवादीची दहशत; त्यांचे बिनविरोध, आमचे अर्ज बाद
अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) दहशत केली जात आहे. या दोन्ही पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर आमच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले, काहींचे अर्ज अवैध ठरविले गेले. आम्ही मात्र, जनतेच्या दारात जाऊन त्यांना कौल मागणार असल्याचे शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव व माजी नगरसेवक संभाजी कदम यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती ठुबे उपस्थित होत्या. यावेळी जाधव म्हणाले, वेगवेगळ्या कारणास्तव सेनेच्या दहा उमेदवारांना पक्षांकडून उमेदवारी करता आली नाही. त्यांना आम्ही निवडणुकीसाठी पक्षांकडून पुरस्कृत करत आहोत. त्यामुळे आमचे आता निवडणूक लढविणारे ४९ उमेदवार आहेत. शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने शहरात दहशत निर्माण केली जात आहे. निवडणुकीसाठी मी कल्याण रोड परिसरात लावलेले होर्डिंग्ज उतरवून घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यासह इतरही प्रकार घडत आहेत. दहशत करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.