भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी यांच्यावर हल्ला; पिंजारगल्ली येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:26 IST2026-01-14T13:25:20+5:302026-01-14T13:26:41+5:30
बंटी डापसेसह चौघांवर गुन्हा

भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी यांच्यावर हल्ला; पिंजारगल्ली येथील घटना
अहिल्यानगर : तू इथे कशाला थांबला आहेस, असे म्हणत शिवीगाळ करून दगडफेक करत भाजपचे प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार सुर्वेद्र दिलीप गांधी यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. १३) पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास पिंजारगल्ली परिसरात घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
करण ऊर्फ बंटी सुनील डापसे, पप्पू डापसे, जितेंद्र सुनील डापसे (तिघे रा. शिलाविहार, सावेडी), भूषण अर्जुन डापसे (रा. वंजारगल्ली, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. याबाबत रोनक सतीश मुथा (रा. चैतन्य कॉलनी, पूनमनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे आडते बाजारात दुकान आहे. ते दुकान बंद करून त्यांच्या चारचाकीतून (एमएच १६, डी.एल. ५५९९) पिंजारगल्ली येथून जात होते. रस्त्यात त्यांना त्यांचे मित्र रोशन गांधी, सुवेंद्र गांधी, ओंकार जोशी भेटले. त्यांच्याशी चर्चा करत असताना तिथे करण ऊर्फ बंटी डापसे याच्यासह वरील चौघे जण आले. यातील बंटी डापसे याने फिर्यादीला विचारले की, तू इथे कशाला थांबला? त्यानंतर त्याने फिर्यादी व सुवेंद्र गांधी यांना शिवीगाळ केली. तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करता, असे म्हणाल्याच्या रागातून बंटी डापसे व पप्पू डापसे यांनी फिर्यादी व सुवेंद्र गांधी यांच्या दिशेने दगडफेक केली. प्रसंगावधान राखून फिर्यादी व गांधी यांनी दगड चुकविले. हे दगड फिर्यादी यांच्या चारचाकीच्या काचेला लागले. त्यामुळे फिर्यादीच्या चारचाकीची पाठीमागील काच फुटली.