Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:22 IST2026-01-01T18:20:25+5:302026-01-01T18:22:43+5:30
Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंह हे गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली या उमेदवारांचे अपहरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसे नेते सुमित वर्मा यांनी केला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या राहुल जाधव यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा आणि अंबरनाथ भालसिंह यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे. केडगाव हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. याच भागातील हे दोन्ही उमेदवार अचानक गायब झाल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
दमदाटी आणि धमकावल्याचा आरोप
मनसे नेते सुमित वर्मा यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, "गेल्या दोन-तीन दिवसांपासून केडगाव परिसरात आमच्या उमेदवारांना निवडणूक न लढवण्यासाठी धमकावले जात होते. त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी वारंवार दमदाटी केली जात होती. आता त्यांचे अपहरण करून लोकशाहीचा गळा चेपण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे."
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या गंभीर प्रकारानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या उमेदवारांच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर उमेदवारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
लोकशाही धोक्यात?
निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांचे अशा प्रकारे गायब होणे, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हे अपहरण आहे की उमेदवारांनी स्वतःहून माघार घेण्यासाठी हा मार्ग निवडला आहे, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. मात्र, या घटनेमुळे केडगाव परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.