अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या तिकिटासाठी इच्छुकांच्या उड्या; भाजप-राष्ट्रवादीची युती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:20 IST2025-12-31T11:20:17+5:302025-12-31T11:20:17+5:30
महाविकास आघाडीचे सर्व जागांवर उमेदवार

अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या तिकिटासाठी इच्छुकांच्या उड्या; भाजप-राष्ट्रवादीची युती
Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेच्या ६८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी पक्षांतर करून शिंदेसेनेचे तिकीट घेण्यासाठी नाराजांच्या उड्या पडल्या. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या काही उमेदवारांना ऐनवेळी एकमेकांच्या पक्षांत जाऊन अर्ज दाखल केले. उद्धवसेनेच्या माजी महापौरांनाही ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी लागली.
अहिल्यानगर महापालिकेत ६८ जागांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी महायुती फुटली. त्यामुळे शिंदेसेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भाजपची युती झाली आहे. उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची आघाडी झाली आहे.
आघाडी, युतीने सर्व जागांवर उमेद्वार दिले आहेत, तर शिंदेसेनेने ५४ जागांवर उमेदवार दिले आहेत. सर्वच पक्षांनी सायंकाळी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनसे आघाडीतून बाहेर पडली असून त्यांनी आठ जागांवर उमेद्वार दिले आहेत.
उमेदवारी डावलताच इच्छुकांचे ऐनवेळी पक्षांतर
उद्धवसेनेचे राष्ट्रवादीत (अजित पवार) : माजी महापौर भगवान फुलसौंदर
भाजपचे राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये : माजी उपमहापौर गीतांजली काळे, महेश तवले
राष्ट्रवादी (अजित पवार) चे शिंदेसेनेत : ओबीसी सेलचे शहरप्रमुख अमित खामकर
राष्ट्रवादी (अजित पवार) चे उद्धवसेनेत : केतन क्षीरसागर
उद्धवसेनेचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात : जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जाधव
राष्ट्रवादीचे (अजित पवार) भाजपत : विकी वाघ, सागर मूर्तडकर
भाजपचे शिंदे सेनेत : नितीन शेलार