मिशन बिनविरोध फेल, अपक्ष झाले नॉटरिचेबल; मत विभागणी टाळण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:49 IST2026-01-03T14:48:51+5:302026-01-03T14:49:28+5:30
Ahilyanagar Municipal Corporation Elections: अपक्षांची मैदानात उडी

मिशन बिनविरोध फेल, अपक्ष झाले नॉटरिचेबल; मत विभागणी टाळण्यात यश
अहिल्यानगर : अनेक प्रभागात विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने बाहुबलींनी मिशन बिनविरोध उघडले होते. छाननीपासूनच त्यांची यंत्रणा कंबर कसून होती. काहींचे रात्री ठरलेही होते. अर्धा डाव जिंकल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले; परंतु ऐनवेळी नकार कळविल्याने काहींचे कार्यकर्ते निवडणूक केंद्रातून बाहेर पडले. काहीजण अचानक नॉटरिचेबल झाले. त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत शोध सुरू होता; ठरल्याप्रमाणे पण माघारीसाठी उमेदवार शेवटपर्यंत केंद्रावर आलेच नाहीत. अपक्षांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अनेकांचे मिशन बिनविरोध फेल गेले.
महापालिकेसाठी छाननीनंतर ६८ जागांसाठी ४४९ उमेदवारांचे अर्ज गुरुवारी वैध ठरविण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) छाननीनंतर लगेच दोन नगरसेवक बिनविरोध करत खाते उघडले. माघारीसाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून पडद्याआडून जोरदार हालचाली सुरू होत्या. सकाळपासूनच माघारी नाट्य सुरू झाले. अपक्षांची मनधरणी करत माघारीसाठी गळ घातली जात होती. अनेकांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नाहीत. त्यांनी माघारीच्या दिवशी वेगवान सूत्रे हलवित बिनविरोधसाठी प्रयत्न केले. अपक्षांच्या घरी जाऊन माघारी घेण्यासाठी विनंती करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी निवडणूक केंद्राबाहेर गर्दी केली होती. काहींनी तर गुलालही आणून ठेवला होता; परंतु शेवटच्या क्षणापर्यंत विरोधी उमेदवारांनी माघार न घेतल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे पडले. प्रशासनाकडून शेवटचे पंधरा मिनिट राहिल्याचा इशारा देण्यात आला. ऐनवेळी चमत्कार होईल, अशी अशा कार्यकर्ते बाळगून होते. काहींना शेवटच्याक्षणी आपल्या समोरील अपक्षांना थांबविण्यात यश आले. यामुळे त्यांना विभागणी टाळता आली.
अनेकांनी अपक्षांना केले थंड
काही प्रभागात मोठ्या प्रमाणात अपक्षांचे उमेदवार होते. त्यामुळे मतविभागणी होऊन फटका बसू शकतो, अशी भीती होती. बिनविरोध झालो नाही तरी चालेल, पण मतविभागणी तर टाळता येईल, असे काहींचे मत होते. त्यांनी अपक्षांची मनधरणी करत उमेदवारी माघारी घेण्यास तयार केले. अपक्षांना थंड करून मत विभागणी टाळण्यात अनेकांना यश आले असून, त्यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे.
सुभाष लोंढे, फुलसौंदर होणार होते बिनविरोध
भाजपचे सुभाष लोंढे बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. त्यांचे कार्यकर्तेही जुन्या महापालिकेत सकाळपासूनच ठाण मांडून होते. विरोधी उमेदवाराची मनधरणी करण्यात लोंढे यांना यश आल्याचेही सांगितले जात होते. शेवटच्याक्षणी चमत्कार होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनासह सर्व अलर्ट मोडवर होते. परंतु, त्यांच्याविरोधातील प्रमुख उमेदवार अर्ज माघारीसाठी केंद्रावर आले नाहीत. त्यामुळे इतर दोन अपक्षांचेही अर्ज कायम राहिले आहेत. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती; परंतु त्यांना पत्नीला बिनविरोध नगरसेवक करण्यात यश आले नाही. शेवटपर्यंत ताणाताणी सुरू होती.