संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणात सध्या उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी मिसळत आहे.
एकरुख योजनेच्या माध्यमातून येत असलेले हे पाणी सध्या हरणा नदीत खळखळते आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वास्तविक कुरनूर धरणातून बोरी नदीद्वारे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. धरण निम्म्यावर आले असताना येणारे उजनीचे पाणी लाखमोलाचे ठरणार आहे.
वास्तविक उजनी धरणात अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भागांसाठी ३ टीएमसी पाणी आरक्षित आहे. वर्षातून दोन टप्प्यांमध्ये हे पाणी सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.
दोन वर्षांपूर्वी एकरुख उपसा सिंचन योजनेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यानंतर सातत्याने हे पाणी कुरनूर धरणात सोडण्यात येत आहे.
वास्तविक मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरनूर धरण जवळपास दोन महिने ओव्हरफ्लो झाले होते. यानंतरही धरणात ८२२ दशलक्ष घनफूट म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
मात्र सद्यस्थितीत बाष्पीभवन, विविध पाणीपुरवठा योजनेतील पाणी उपसा व शेतीसाठी सुरू असलेल्या पाणी उपशामुळे धरणात ४८ टक्के म्हणजेच ३९४.५६० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
प्राप्त असलेल्या पाणीसाठ्यामुळे यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे चित्र आहे. पण तरीही पाणी वापर प्रक्रियेचा विचार करता उजनीचे येणारे पाणी हे अक्कलकोट तालुक्यासाठी लाखमोलाचे ठरणार आहे.
दोन पंप महिनाभर सुरू राहणार
◼️ उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
◼️ हे पाणी कारंबा शाखा कालवामार्गे हिप्परग्यातील एकरूख तलाव-हिप्परग्गा पंप हाऊस ते बोरामणी पंप हाऊसमधून दर्शनाळ कालव्याद्वारे हरणा नदीतून पाणी कुरनूर धरणात येते.
◼️ सबंधित विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन पंप सुरू केले आहेत.
◼️ हे पाणी आणखी महिनाभर सुरू ठेवण्याची शक्यता आहे.
कुरनूर धरणावर अवलंबून असलेले शेतकरी, ३ नगरपालिका व ५२ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी संबंधित विभागाला एकरुख योजनेच्या माध्यमातून कुरनुर धरणात पाणी सोडण्यासाठी यापूर्वीच आदेश देण्यात आले आहेत. संबंधित विभागाकडून तशी कार्यवाहीदेखील सुरू आहे. अतिवृष्टीमुळे यंदाच्या वर्षी पाणी मुबलक असले तरीही सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाण्याचा काटकसरीने वापर करावा. - सचिन कल्याणशेट्टी, आमदार
अधिक वाचा: दहा किलोवॅटपेक्षा अधिक सौर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका; लागू होणार आता 'हे' चार्जेस
