गणेश पोळ
टेंभुर्णी: इंदापूर, दौंड तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी पहिल्यांदाच मे महिन्यात मृत साठ्यात गेले. मंगळवारी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लसकडे वाटचाल केली आहे.
उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यात व उजनी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाचीपाणीपातळी दहा दिवसांत २३ टक्क्यांनी वाढली आहे.
रविवारी दौंड येथून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला होता. त्यात सोमवारी सकाळी वाढ होऊन १८ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू होता तर दुपारी १२ वाजता २२ हजार क्युसेक होता.
सोमवारी सायंकाळी ६ वाजता १९ हजार ३२८ क्युसेक विसर्ग सुरू होता. असाच विसर्ग कायम राहिला असून, मंगळवारी उजनी मृत साठ्यातून बाहेर आले.
दि. २१ एप्रिल रोजी उजनी धरण मृत साठ्यात गेले होते. तर १४ मेपर्यंत उजनी धरणाचीपाणीपातळी वजा २२.९६ टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. १८ मेपर्यंत पाणीपातळी स्थिर राहिली होती. १८ मेपासून गेल्या आठ दिवसांत १० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
सोलापूर, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांत उजनी पसरलेले असल्याने या स्थानिक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने, उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
उजनी धरण परिसरात गेल्या दहा दिवसांत १७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारीदेखील दिवसभरात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
१४ मे रोजी उजनी धरणात ५१.३६ टीएमसी पाणीसाठा होता. सायंकाळी ६ वाजता ६१.१२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. वजा ४.७२ टक्के पाणीपातळी होती.
उजनी मुख्य कालवा बंद करण्यात आला असून, भीमा-सीना जोड कालव्यातून १६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गतवर्षी उजनी २६ जुलै रोजी मृत साठ्यातून बाहेर आले होते.
यंदा उजनी धरणाच्या इतिहासात प्रथमच उन्हाळ्यात १८ एप्रिल रोजी मृत साठ्यात जाऊन २७मे रोजी मृत साठ्यातून बाहेर आले आहे. गतवर्षीचा तुलनेत दोन महिने अगोदर उजनी मृत साठ्यातून बाहेर आले आहे.
गेल्या पाच वर्षांत यावेळेस आले मृत साठ्यातून बाहेर
१८ जुलै २०२०
२२ जुलै २०२१
१२ जुलै २०२२
१ ऑगस्ट २०२३
२७ जुलै २०२४
२७ मे २०२५
अधिक वाचा: सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर