टेंभुर्णी : एप्रिल महिन्यातील चैत्र संपून वैशाख लागताच उन्हाचा पारा चढत असताना उजनी धरण तळ गाठायला सुरुवात करते.
साधारण एप्रिलअखेर मृत साठ्यात जाणारे उजनी धरण यावर्षी लांबलेला मान्सून पाऊस व योग्य नियोजन केल्यामुळे सध्या तरी १५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
पुढील आठवड्यात गुरुवारी कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठकीतील निर्णयानुसार उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.
गतवर्षी याच दिवशी १९ एप्रिल २५ रोजी उजनी धरण मृत साठ्यात गेले होते. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.
दिवसाचे तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने दिवसाला उजनी धरणातून ०.०३ टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे.
महिन्यात साधारण १.५ ते २ टीएमसीपर्यंत पाणी बाष्पीभवन होत आहे. वर्षात १२ ते १३ टीएमसी तर उन्हाळ्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यात ५ ते ६ टीएमसी पाणी बाष्पीभवन होत आहे.
मुख्य सध्या उजनीतून शेतीसाठी उजनी कालव्यातून २ हजार ८६० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून ८६० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २७० क्युसेक तर दहिगाव योजनेतून ८० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
यावर्षी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात ८२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. साधारण ५०० ते ६०० मिलीमीटर पाऊस उजनी धरण क्षेत्रात होत असतो.
६३.६२ टीएमसी मृत पाणीसाठा
◼️ सध्या उजनी धरणाची पाणीपातळी २८.११ टक्के असून, धरणात एकूण ७८.७२ टीएमसी पाणीसाठा आहे. यात ६३.६२ टीएमसी पाणीसाठा मृत साठ्यात धरले जाते.
◼️ धरणाची कागदी आकडेवारी टीएमसीमध्ये दिसत असली तरी गेल्या ४५ वर्षात उजनी धरणातील साठलेल्या गाळामुळे १२ ते १३ टीएमसीपर्यंत गाळ साचला असल्याचा अंदाज जलतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
◼️ अंदाजे ५० टीएमसीपर्यंत उजनी मृत साठ्यात शिल्लक राहत असल्याचा अंदाज आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनुसार अंमलबजावणी
◼️ गुरुवारी (दि. १६ एप्रिल) कालवा सल्लागार समितीची ऑनलाईन बैठक झाली होती. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.
◼️ साधारण पुढील आठवड्यात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल, असे उजनी धरण मुख्य अभियंता सुचेता डुंबरे यांनी सांगितले.
उजनीतील बाष्पीभवन रोखण्यासाठी फ्लोटिंग सोलरची योजना प्रस्तावित आहे. यासाठी केंद्रीय यंत्रणांना निविदा प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याबाबत विचार सुरू आहे. लवकरच याबद्दल निर्णय घेतले जातील. - राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
अधिक वाचा: राज्यात गारांचा मारा; पुढील तीन दिवस राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी बरसणार
