दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी सकाळी ठिकठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.
तर महामुंबईमध्ये पेण, बदलापूर आणि कर्जत या ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असून हवामानातील हे बदल पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहेत.
सतर्कतेचा इशारा
◼️ हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २२ ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे.
◼️ विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
◼️ हवामानातील हे बदल दिलासा देणारे असले तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
नागरिकांसाठी सूचना
◼️ विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
◼️ झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.
◼️ मोकळ्या जागेत मोबाइल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.
◼️ यात्रा, धार्मिक कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन स्थगित करावे.
राज्यात कुठे कुठे पडला पाऊस?
हिंगोली : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसात वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजली. शेतातील उभी ज्वारी आडवी झाली.
सिंधुदुर्ग : कणकवली शहरासह परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. आठवडा बाजार असल्याने ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.
रायगड : पेण, कर्जत, बदलापूर आणि इतर परिसरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
सोलापूर : सोलापुरात संध्याकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली.
अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक
