सोलापूर : अवकाळी पावसात वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः नारळाच्या झाडावरच वीज पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. इतर झाडाच्या तुलनेत नारळाचे झाड सर्वात उंच असल्याने ते नैसर्गिकरीत्या विजेला आकर्षित करते.
नारळाच्या झाडांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांची विद्युत चालकता अधिक असते, ज्यामुळे वीज त्यांच्याकडे आकर्षित होण्याची शक्यता असल्याचे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात आले.
नारळाच्या झाडावरच वीज का पडते, या शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही केवळ एक योगायोग नसून त्यामागे ठोस शास्त्रीय कारणे दडलेली आहेत. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नारळाचे झाड आकाशातील विजेसाठी एका 'सुलभ लक्ष्या' सारखे काम करते.
नारळाच्या झाडाचा टोकदार शेंडा
◼️ सभोवताली असलेले ओलसर वातावरण आणि झाडाचा नारळाच्या झाडाचा टोकदार शेंडा यामुळे स्थानिक विद्युत क्षेत्र अधिक तीव्र बनते, आणि विजेचा प्रहार होण्याची शक्यता वाढते.
◼️ वीज कोसळताना निर्माण होणारे अत्यंत उच्च तापमान झाडातील कोरडे भाग किंवा पाने पेट घेण्यास कारणीभूत ठरतात, परिणामी आग लागण्याच्या घटना घडतात.
उत्तम विद्युत वाहक
◼️ नारळाच्या झाडाच्या खोडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यातील क्षारयुक्त रस विजेचे उत्तम सुवाहक असतात.
◼️ त्यामुळे वीज प्रवाहित होण्यासाठी हे झाड एक कमी रोध असलेला मार्ग उपलब्ध करून देते.
◼️ नारळाची झाडे सहसा पाणी असलेल्या जमिनीत असतात.
◼️ झाडाची मुळे जमिनीत खोलवर असतात, ज्यामुळे झाडाला एक प्रकारचे नैसर्गिक 'अर्थिंग' मिळते.
◼️ हे अर्थिंग आकाशातील प्रचंड विद्युत ऊर्जेला थेट जमिनीकडे खेचण्यास मदत करते.
सावधानता बाळगणे आवश्यक
◼️ पावसाळ्यात किंवा वीज कडाडत असताना नारळाच्या झाडाखाली उभे राहणे जीवावर बेतू शकते.
◼️ झाडाची उंची आणि त्यातील पाण्याचे प्रमाण यामुळे त्यावर वीज पडण्याची शक्यता सर्वाधिक असते.
◼️ त्यामुळे अशा वेळी सुरक्षित स्थळी आश्रय घेणेच हिताचे ठरते.
वीज केवळ नारळाच्या झाडांवरच पडते असे नाही. परंतु उंच, एकाकी आणि ओलसर रचनेची झाडे अधिक धोकादायक ठरतात. त्यामुळे अशा भागात योग्य सुरक्षा उपाययोजना करणे, तसेच वीज कोसळण्याच्या वेळी झाडांपासून दूर राहणे आवश्यक आहे. - प्रा. डॉ. विनायक धूळप, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ
अधिक वाचा: पुरवठा विभाग अॅक्शन मोडवर; 'या' तीन निकषात बसणाऱ्या रेशनकार्डवरील धान्य होणार बंद
