महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:41 PM2019-05-24T13:41:39+5:302019-05-24T13:57:57+5:30

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Yavatmal Washim Election Result 2019: Shiv Sena bhavana gawali win | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

Next
ठळक मुद्देयवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भावना गवळी यांना एकूण 5 लक्ष 42 हजार 98 मते पडली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी खासदार भावना गवळी यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

यवतमाळ - यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी खासदार भावना गवळी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व आदी उपस्थित होते.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता शासकीय धान्य गोदामात सुरूवात झाली. एकूण 30 फेऱ्यांमधील ही मतमोजणी उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाणे यांनी भावना गवळी यांना विजयी घोषित केले. भावना गवळी यांना एकूण 5 लक्ष 42 हजार 98 मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावर माणिकराव ठाकरे यांना 4 लक्ष 24 हजार 159, प्रविण पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची 94 हजार 228 मते पडली. या मतदार संघात एकूण वैध मते 11 लक्ष 74 हजार 220 तर अवैध  मते 604 असे एकूण 11 लक्ष 74 हजार 824 मतांची मतमोजणी करण्यात आली. यात पोस्टल बॅलेट पेपरच्या 4847 मतपत्रिकांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा संसदेत

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या भावना गवळी एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेऊन पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.शिवसेनेच्या भावना गवळी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेऊन होत्या. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. 2014 च्या तुलनेत यावेळी काँग्रेस व शिवसेनेला अधिक मते मिळाली. 2014 मध्ये सेनेला असलेली 93 हजार मतांची आघाडी यावेळी दहा ते 15 हजाराने वाढून एक लाखांवर गेली. 19 लाखांपैकी 11 लाख 60 हजार (61 टक्के) मतदारांनी 11 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मोजणी गुरुवारी दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामातून सुरू झाली. सायंकाळी शिवसैनिकांनी शहरातून ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळत मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष केला.

हा विकासाचा विजय - गवळी

आपण गेली 20 वर्षे लोकसभेचे प्रतिनिधीत्व करीत असून या काळात विविध विकास कामे खेचून आणली. त्या विकासालाच मतदारांनी पसंती दर्शवित मला पाचव्यांदा संसदेत जाण्याची संधी दिली. या विजयामागे मतदारांची पसंती व सामान्य कार्यकर्त्यांचे परिश्रम महत्वाचे ठरले.

- भावना गवळी, शिवसेना

पराभव मान्य - ठाकरे

मतदारांनी दिलेला कौल काँग्रेसला मान्य आहे. सरकारबाबत समाजाच्या सर्वच स्तरात प्रचंड नाराजी होती. परंतु ही नाराजी मतांमध्ये परावर्तीत करण्यात आम्ही अपयशी ठरलो. या पराभवाची कारणमिमांसा केली जाईल. पक्ष-संघटन बांधणीसाठी आणखी जोमाने कामाला लागू.

- माणिकराव ठाकरे, काँग्रेस.


महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा-शिवसेनेला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात मुख्य लढत भाजपा-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजपा, 18 जागांवर शिवसेना, 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.


 

Web Title: Yavatmal Washim Election Result 2019: Shiv Sena bhavana gawali win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.