सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची 

By दीपक शिंदे | Published: April 24, 2024 11:55 AM2024-04-24T11:55:28+5:302024-04-24T11:59:01+5:30

शशिकांत शिंदेंच्या जोडीला कोण कोण ?

For the Satara-Jawali Lok Sabha the role of Key Fanctor, MLA ShivendraSinghRaje is important | सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची 

सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची 

दीपक शिंदे

सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा-जावली विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा घटक आहे. सातारा आणि जावली या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले करत आहेत. या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड असल्याने ते काय सूचना करतात, याकडेच अनेकांचे लक्ष्य आहे. याचवेळी जावली तालुक्यात शशिकांत शिंदे यांनी दोन टर्म आमदार म्हणून काम केले आहे. त्यातच यांचे स्वत:चे गाव असल्यामुळे जावली आणि सातारा या दोन्ही ठिकाणी त्यांचीही बांधणी आहे. त्यामुळे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघ हा या निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख मतदान आहे. जिंकून येणाऱ्या उमेदवाराला साधारणत: साडेपाच ते सहा लाख मतदान होते. म्हणजेच उमेदवारांना जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या मतदानाच्या ५० टक्के मतदान हे या दोन तालुक्यात मिळून आहे. शिवेंद्रराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीला सातारा तालुक्यात अजिबात शिरकाव करू दिला नाही. जर कोणी प्रयत्न केला तर त्याचा तिथेच बंदोबस्त केला आहे.

शशिकांत शिंदे यांनीही एकदा सातारा तालुक्यात पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना जिल्हा बँकेला घाम फोडला. अगदी एका मताने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, जावली तालुक्यात शशिकांत शिंदे यांनाही मानणारा वेगळा वर्ग आहे. जावली तालुक्यातून भूमिपुत्रासाठी या भागातील लोकांनी देखील काहीतरी नियोजन केले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंसाठी वेगळी भूमिका आणि इतरांसाठी वेगळी भूमिका असे नियोजन असू शकते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले हे खासदार उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचार रथावर दिसले. त्यापूर्वीही त्यांनी मेळावा घेऊन नगरसेवकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही नगरसेवकांनी उघड मते मांडल्याने त्यांच्यातील नाराजी लपून राहिली नव्हती. त्यामुळे आता थोडा ब्रेक घेऊन ते पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत.

या भागात शिवेंद्रराजेंची ताकद

सातारा तालुक्यातील परळी, नागठाणे, अतित, कास पठार, कोंडवे, लिंब याठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारा गट आहे. सातारा शहरातील नगरपालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांची सत्ता असल्याने आणि अधिकाधिक नगरसेवक त्यांचेच असल्याने याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

जावलीत शशिकांत शिंदेंची वैयक्तिक ताकद

जावलीमध्ये शशिकांत शिंदे यांनी दोन वेळा आमदारकी केली आहे. त्यामुळे यांची स्वत:ची वैयक्तिक ताकद आहे. त्यांच्या जोडीला दीपक पवार यांचाही गट असणार आहे. शिवाय सातारा शहरात देखील विधानसभेला दीपक पवार यांना चांगली मते मिळाली होती. ती त्यांच्या सोबत असतील.

Web Title: For the Satara-Jawali Lok Sabha the role of Key Fanctor, MLA ShivendraSinghRaje is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.