सगळं निश्चित झालं, मी लढणारच; दिल्लीतून येताच उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 06:01 PM2024-03-27T18:01:49+5:302024-03-27T18:12:07+5:30

Satara Lok Sabha: उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेलेल्या उदयनराजेंना भाजप नेतृत्वाने तीन दिवस वेळच दिली नसल्याचं बोललं जात होतं. याबाबतही त्यांनी आता खुलासा केला आहे.

Everything is settled I will fight from satara lok sabha seat Udayanraj announced his candidacy as he came from Delhi | सगळं निश्चित झालं, मी लढणारच; दिल्लीतून येताच उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा

सगळं निश्चित झालं, मी लढणारच; दिल्लीतून येताच उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा

Udayanraje Bhosale ( Marathi News ) :सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र मागील चार दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत स्वत: उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात आल्यानंतर माहिती दिली आहे. यावेळी समर्थकांनी उदयनराजेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.

उमेदवारीबद्दल बोलताना उदयनराजे म्हणाले की, " लोकांचं अलोट प्रेम पाहून मन भारावून गेलं. मी आयुष्यात राजकारण कधी केलं नाही. लोकांना केंद्रबिंदू मानून मी समाजकारण केलं. त्याचीच पोचपावती म्हणून आज लोक एवढ्या संख्येने उपस्थित आहेत. हे सगळं बघून काय बोलावं, हे मला सुधरत नाही. कालही मी जनतेसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.  उमेदवार यादी आज जाहीर होईल. तो एक प्रक्रियेचा भाग आहे. पण सगळं निश्चित झालं आहे. मी निवडणूक लढणारच आहे," असा दावा त्यांनी केला आहे. 

"मला दिल्लीत ताटकळत ठेवल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही"

उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेलेल्या उदयनराजेंना भाजप नेतृत्वाने तीन दिवस वेळच दिली नसल्याचं बोललं जात होतं. हा दावा खोडून काढत उदयनराजेंनी म्हटलं आहे की, "मला दिल्लीत ताटकळत ठेवलं, अशा ज्या बातम्या येत होत्या, तसं काही नाही. सध्या फक्त महाराष्ट्रातील निवडणुका नसून संपूर्ण देशात निवडणूक होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होणार आहे, त्या अनेक जागांवर महायुतीत तेढ निर्माण झाली होती. ती तेढ दूर करण्यात आली आहे. आता त्यात कोणत्याही प्रकारची अडचण राहिली नाही," असं उदयनराजे म्हणाले.

शरद पवारही सातारा दौऱ्यावर

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही काही रुसवे-फुगवे आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित करण्यात वेळ जात आहे. त्यातच महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतरच शरद पवार आपले फासे टाकतील अशीही अटकळ बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवरच शरद पवार हे शुक्रवारी सकाळी साताऱ्यात येत आहेत. काही तासांसाठीच ते येत असून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेणार आहेत. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असावा, कोणाचा विरोध आहे का ? याचीही चाचपणी ते करणार असल्याचे समजते. त्यामुळे शुक्रवारच्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Web Title: Everything is settled I will fight from satara lok sabha seat Udayanraj announced his candidacy as he came from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.