- सचिन जवळकोटे

माणदेशी तरंग वाहिनी अर्थात ९०.४. मुक्काम पोस्ट म्हसवड. 
महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला खास महिलांचा हा कम्युनिटी रेडिओ.
या रेडिओवरच्या आर.जे. महिलाही अस्सल माणदेशी. त्यांची बोलीही तीच, तशीच रांगडी. 
आपल्या गावरान ठसक्यात त्या आमदार, कलेक्टरांच्या मुलाखती घेतात. प्रश्न विचारतात आणि 
बिन्धास्त सांगतात, ‘पैल्यांदा त्वांडासमूर मैक आला तवा म्या लई टेन्शनमंदी हुते बगा.. 
पन आता समदी प्राक्टीस झालीया.’

गुड मॉर्निंऽऽग मुंबाऽऽय...
विद्या बालनच्या गोड आवाजातला हा लकबीदार डॉयलॉग ऐकण्यासाठी म्हणे आजपावेतो अनेकांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ कैक वेळा बघितलेला. या पिक्चरमधली आर. जे. अर्थात जान्हवी. तिचा हा विशिष्ट हेल लोकांना खूप भावून गेलेला. त्या पात्रामुळं प्रत्यक्षातल्या ‘रेडिओ जॉकी’चाही वट्ट भलताच वाढलेला.
आता तर जळीस्थळी ‘एफएम’चाच ‘बॅण्ड’ वाजतोय. नाजूक आवाजातल्या निवेदिकेचं शांत सुरातलं निवेदन गायब होऊन दमदार आवाजातला लाइव्ह संवाद कानावर आदळतोय. 
पण आर. जे. म्हणजे सफाईदार आणि फाडफाड इंग्रजी यायला हवं. समोरच्याला आडवे-तिडवे प्रश्न विचारून बेजार करायला जमलं पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं फास्ट अ‍ॅण्ड फास्टऽऽ काहीही बोलता आलं पाहिजे.
...एफएम रेडिओंच्या या चमकदार जगात सध्या मात्र एक अस्सल गावरान आवाज माणदेशात घुमतोय... 
गुड मॉर्निंऽऽग गंगूऽऽबाय... 
होय. आयुष्यात कधीच शाळेची पायरीही न चढलेली पासष्ट वर्षांची केराबाई ‘माणदेशी रेडिओ’वरनं तीन जिल्ह्यांतल्या महिलांशी रोज मोठ्या आत्मविश्वासानं संवाद साधतात. डोक्यावर पदर अन् कानावर हेडफोन घेऊन या खेडवळ वाटणाऱ्या बाई रोज वेगवेगळ्या कला सादर करतात. 
त्यातून लाखो महिलांची करमणूक करतात आणि हे कमी की काय म्हणून अनेकींच्या पोटापाण्याचा प्रश्नही याच रेडिओवरनं सोडवतात.
रेडिओ म्हणजे केवळ मनोरंजनाचं नव्हे, तर सर्वसामान्यांच्या जगण्याचे प्रश्न सोडवणारं एक हुकमी माध्यम. श्रोत्यांसाठी स्वस्त आणि त्यांची कुठंही सोबत करणारं. आता त्याच रेडिओच्या परिभाषेला अधिक व्यापक बनवलंय या माणदेशातल्या अनोख्या कम्युनिटी रेडिओनं.
कागदोपत्री या रेडिओचं तांत्रिक नाव आहे- ‘माणदेशी तरंग वाहिनी अर्थात ९०.४’ ...मुक्काम पोस्ट म्हसवड.
गेल्या दोन तपांपासून माणदेशात महिलांसाठी धडाडीनं काम करणाऱ्या ‘माणदेशी फाउंडेशन’च्या अध्यक्ष चेतना सिन्हा सांगत होत्या, ‘नऊ वर्षांपूर्वी आम्ही ही 

वाहिनी सुरू केली. देशात तीन प्रकारचे रेडिओ. एक सरकारी, दुसरे खासगी एफएम अन् तिसरा आमच्यासारखा कम्युनिटी रेडिओ. सातारा जिल्ह्यातील माण, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला-माळशिरस अन् सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आमचा रेडिओ ऐकायला मिळतो. सुमारे तीस ते चाळीस किलोमीटर परिसरात आमच्या रेडिओचं कार्यक्षेत्र चालतं. सुरुवातीला केवळ दहा मिनिटं सुरू असणारा हा रेडिओ आता रोज आठ तास ऐकला जातो.’
चेतना सिन्हा यांनी मोठ्या हिमतीनं माणदेशी महिला बँकही काढलीय. आज त्याच्या सहा शाखा असून, बचतगटांच्या माध्यमातून तब्बल पंचेचाळीस हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. या बचतगटांनी तयार केलेल्या ग्रामीण वस्तूंना मार्केट मिळवून देण्यासाठी सातारा-मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदर्शनं भरवण्याचं धाडसही त्यांनी दाखवलंय. 
‘महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला महिलांचा रेडिओ’ म्हणून ओळखली जाणारी ही तरंग वाहिनी आता माणदेशाची ओळख बनलीय. गदिमा अन् व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या साहित्यातून जगासमोर आणलेल्या माणदेशी संस्कृतीचं अस्तित्व जपण्यासाठी सातत्यानं ही वाहिनी प्रयत्न करतेय. 
माणदेशी महिलांनी स्वत: गायलेल्या दुर्मीळ भक्तिगीतांनी या रेडिओची सकाळ सुरू होते. त्याच्या जोडीला असतात इथलीच लोकगीतं अन् इथलीच भजनं. 
नो डुप्लिकेट. नो उचलाउचली. सबकुछ ओरिजनल.
स्टुडिओची तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे सचिन मेनकुदळे माहिती देत होते, ‘दुपारच्या वेळी महिला निवांत असतात. त्यावेळी आम्ही फोनद्वारे इथल्या महिलांचे प्रश्न मांडण्याचा अन् सोडवण्याचा लाइव्ह शो करतो. सोबतीला उखाणी, गाणी अन् विनोदाची मनोरंजक जोड असतेच. विशेष म्हणजे, माणदेशातील महिला श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या निवेदिकाही माणदेशी महिलाच असतात. त्यांच्याच बोलीभाषेत चर्चा होत असल्यानं प्रत्येकीला हा रेडिओ म्हणजे हक्काचा अन् जिव्हाळ्याचा माहेरचा माणूसच वाटतोय.’
आषाढी एकादशी जवळ आली की अवघा सातारा जिल्हा वारीमय बनतो. नीरा नदी ओलांडून जिल्ह्यात आलेली माउलींची वारी सोलापूर जिल्ह्याकडे रवाना होईपर्यंत या रेडिओवर ‘पंढरीची वारी.. माणदेशी दारी’ हा लाइव्ह कार्यक्रम रोज होत असतो . 
ऐन देव दीपावळीत होणाऱ्या म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेतही चक्क महिला हातात माइक घेऊन गर्दीत घुसतात. कुठल्या चौकात भाविकांची गर्दी वाढलीय, कुठल्या रस्त्यावरून भाविकांनी पुढं सरकायला हवं याचं लाइव्ह रिपोर्टिंग करण्यात पुढाकार घेतात त्या इथल्या माणदेशी तरुणी. यामुळं पोलिसांवरचा ताणही कमी होतो.
लता जाधव असो वा सुषमा भोवते, हर्षली कांबळे असो की केराबाई सरगर..
यांची नावं सध्या माणदेशातल्या घराघरांत तोंडपाठ आहेत. 
अडाणी केराबाई तर इथल्या महिलांच्या दृष्टीनं जणू सेलिब्रिटीच. तिनं आजपावेतो बड्या-बड्या मंडळींच्या मुलाखती घेतल्यात. आमदार असो की कलेक्टर, कपाळावरच्या ठसठशीत कुंकवाच्या साक्षीनं भरदार व्यक्तिमत्त्वाची ही अडाणी बाई जेव्हा दमदार आवाजात धडाधड प्रश्न विचारू लागते, तेव्हा सारेच एकदम चाट पडतात.
इथं रेकॉर्डिंगसाठी आलेली एक महिला कलाकार गंगूबाई आपला अनुभव सांगत होती, ‘पैल्यांदा त्वांडासमूर मैक आला तवा म्या लई टेन्शनमंदी हुते बगा.. पन आता संमदी प्राक्टीस झालीया. रोज येगयेगळ्या रेडिओचे प्रोगराम ऐकुनशान आमीबी आता कसं बोलायचं, कुठंशी थांबायचं ह्ये समदं शिकलुया. रेड्यू टेसनमंदनं फ्वॉन आला की आमचं समदं वाद्य-बिद्य घिवुनशान आमी ईश्टुडियोमंंदी हजर हुताव. डायरेऽऽक्ट रेकारडिंगच सुरू करताव. रिटेक नाय की फिटेकनायऽऽ..’
गंगूबाईच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता. विशेष म्हणजे, तिच्या प्रत्येक वाक्यागणिक एकतरी इंग्रजी शब्द होता. आपण जगाच्या मागं नाही, हे दाखवून देण्याची धडपड तिच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणवत होती.
नागपंचमीच्या सणावेळी इथल्या राम मंदिरात शेकडो महिला एकत्र येतात. नऊवारी साडीचा काष्टा घालून या बायका जेव्हा एक से एक उखाणे घेऊ लागतात तेव्हा या रेडिओचा लाइव्ह कार्यक्रम ऐकणारी मंडळीही पोट धरधरून हसतात; कारण इथले माणदेशी उखाणे काही साधेसुधे नसतात. त्यात असतात शेळ्या, मेंढ्या, मातीची ढेकळं, नवऱ्याचा फेटा अन् बरंच काहीबाही. एकेक उखाणे तर तब्बल पाच-पाच मिनिटांचे असतात. एकदम लांबलचक तरीही रंजक. 
‘केवळ मनोरंजन नको, तर महिलांच्या आयुष्यात खराखुरा बदल हवा’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या या रेडिओवरचे दोन कार्यक्रम खूप महत्त्वाचे ठरलेत. पहिला म्हणजे महिलांच्या आरोग्यासाठी महिला डॉक्टरांनी सुरू केलेला ‘रेडिओ डॉक्टर’ कार्यक्रम. गावोगावी मन लावून ऐकला जातो हा कार्यक्रम. विशेष म्हणजे, माण तालुक्यातील झाडून साऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरच्या आरोग्यसेविकांना यात हिरीरीनं बोलतं केलेलं असतं. तालुक्यातील एकूण चाळीस शाळांमधल्या शिक्षिकाही मोठ्या कौतुकानं यात सहभागी होतात. .
दुसरा कार्यक्रम म्हणजे, माळावरचं शिवार. ज्यात दुष्काळी माणदेशातील शेतीप्रश्नांवर अधिक भर दिला गेलाय. चर्चेसाठी महिला कृषितज्ज्ञांनाही सामावून घेतलं गेलंय. 
इथं पिण्याच्या पाण्याचीही मारामार. त्यामुळं पिकं घेण्यापेक्षा शेळ्या-मेंढ्यांचा जोडधंदा करण्यावर लोकांचा अधिक भर. त्यामुळे ‘शेळ्यांचं आरोग्य कसं टिकवायचं?’ या आवडीच्या विषयावर अनेकवेळा ‘लाइव्ह टॉक शो’ होतो. कुठल्यातरी दूरवरच्या वस्तीतल्या अंगणातल्या शेळीचा प्रॉब्लेम एक महिला आपल्या साध्या मोबाईलवरून विचारते, तेव्हा त्याचं उत्तर देण्यासाठी स्टुडिओत एक ‘गोट डॉक्टर’ तयार असते. नंतर हीच गोट डॉक्टर त्या वस्तीवर समक्ष भेट देऊन समस्या निवारणही करते. 
माण तालुक्यातील शेळीपालनाचं तंत्र अचूकपणे समजावून घेतलेल्या तालुक्यातल्या सात महिलाच आता ‘गोट डॉक्टर’ बनल्या आहेत. बोकडाच्या कृत्रिम रेतनापासून ते कोकराचं वजन वाढविण्यापर्यंतच्या प्रत्येक समस्येवर यांच्याकडे परफेक्ट उत्तर असतं. फक्त तुम्ही एवढंच करायचंं.. आपल्या अंगणातून थेट ‘रेडिओ’वालीला कॉल करायचा.. म्हणजे तिकडं ‘लाइव्ह सल्ला’ अन् इकडं ‘प्रॅक्टिकल उपचार.’

येक नंबर काम झालंया.. 
लईच रेटून बोलतीया !
या रेडिओवरची अजून एक निवेदिका लता जाधव हिचं शिक्षण डी.एड.पर्यंत झालेलं. सुरुवातीला कुठंच नोकरी मिळेना. इथं जागा निघाली तेव्हा तिनं सहज अर्ज केला. ‘टेस्ट’च्या वेळी पुण्या-मुंबईचे अनेक पट्टीचे कलाकार आलेले; परंतु ‘रेडिओ’ला हवी होती माणदेशी भाषेत बोलणारी अस्सल स्थानिक निवेदिकाच. 
पण आजपर्यंत साधा मोबाइलही न वापरणारी लता थेट स्टुडिओतल्या मशिनरीवर काम करू लागली. सुरुवातीला खूप चुका झाल्या. गमती-जमती घडल्या. अखेर आता ती ‘माणदेशी माणसांच्या गावाकडच्या गोष्टी’ मोठ्या ऐटीत कथन करू लागलीय. अगदी माणदेशी भाषेतच बोलायचं झालं तर ‘येक नंबर काम झालंया.. लता लईच रेटून बोलतीया !’

आर.जे.केराबाई 
रेडिओ स्टेशनच्या स्टुडिओतली मशीनरी हॅण्डल करायची म्हणजे त्यांचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेली अभियंता मंडळीच हवीत. परंतु इथल्या स्टुडिओतल्या वयस्कर केराबार्इंचा आयुष्यात ‘अ-ब-क-ड’शीही कधी संबंध न आलेला. तरीही कानाला हेडफोन लावून अनुभवातून एकेक यंत्र त्या नीट समजून घेत गेल्या. ‘आॅडिओ मिक्सर’चं कुठलं बटन कुठं खाली वर केलं की समोरचा आवाज व्यवस्थित रेकार्ड होतो, याचं गणित ओळखून हातातल्या बांगड्यांचा आवाज न करता छानपैकी ‘प्रोग्रॅम एडिट’ करू लागल्या. 

नवरा जखमी झाल्यावर 
रेडिओनं दाखवला जगण्याचा मार्ग !
या रेडिओवरच्या कार्यक्रमामुळे अनेकांचे कोलमडलेले संसारही पुन्हा उभारले गेलेत. खटाव तालुक्यातील नडवळच्या शोभा जाधव यांचे पती अपघातात जखमी झालेले. घरचा कर्ता पुरुषच जायबंदी झाल्यानं संसाराचा गाडा चालवणं मुश्कील बनलेलं. अशावेळी त्यांनी एकदा खचलेल्या आवाजात या ‘रेडिओ’च्या लाइव्ह कार्यक्रमात जगण्याचा मार्ग विचारला अन् इथंच त्यांचा प्रश्नही सुटला. त्यांना घरबसल्या शेळीपालनाची सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांना पोटा-पाण्याचा मार्ग सापडला. संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत झाला.