Biological E चा 'महिमा', हैदराबादेत बनतेय जगातली सर्वात स्वस्त लस 'कोर्वेव्हॅक्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:10 PM2021-06-05T21:10:05+5:302021-06-05T21:21:47+5:30

बायोलॉजिक ई कंपनीकडून कोरोनावरील कोर्वेवॅक्स ही लस उत्पादीत करण्यात आली असून तिची ही जगातील सर्वात कमी किंमतीची लस ठरू शकेल.

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे.

केंद्र सरकारनं हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई कंपनीसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. सरकारनं कंपनीला ३० कोटी रुपये रक्कम आगाऊ दिली आहे. त्याबदल्यात कंपनी ३० कोटी डोस राखीव ठेवणार आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान बायोलॉजिकल-ई कंपनी लसींचा साठा करेल.

बायोलॉजिकल-ई तयार करत असलेली लस आरबीडी प्रोटिन सब युनिट प्रकारातील आहे. यामध्ये SARS-CoV-२ चे रिसेप्‍टर-बायडिंग डोमेन (RBD) डिमेरिक स्वरुपाचा वापर अँटिजेन म्हणून करण्यात आला आहे.

लसीची क्षमता वाढवण्यासाठी त्यात एक CpG १०१८ चा वापर करण्यात आला आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. यामधलं अंतर २८ दिवसांचं असेल. त्यामुळे लसीकरण लवकर पूर्ण होऊ शकेल.

बायोलॉजिकल-ई कंपनीला २४ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्याची मंजुरी मिळाली. कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या नोव्हेंबर २०२० मध्ये सुरू केल्या.

३६० जणांवर करण्यात आलेल्या चाचणीबद्दलची आकडेवारी कंपनीनं जाहीर केलेली नाही. चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक असल्याची त्रोटक माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका महिमा डाटला यांनी दिली आहे.

आता देशातील १५ ठिकाणी १ हजार २६८ जणांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जातील. याशिवाय संपूर्ण जगातही कंपनी चाचण्या घेईल.

केंद्र सरकार ३० कोटी डोससाठी कंपनीला १५०० कोटी रुपये देणार आहे. म्हणजेच एका डोससाठी सरकार ५० रुपये मोजेल. बाजारात ही लस कितीला मिळेल याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही.

जगातील सर्वात स्वस्त लस हीच असण्याची दाट शक्यता आहे. एका वृत्तानुसार, लसीच्या एका डोसची किंमत १.५ डॉलर प्रति डोस (११० रुपये) असू शकते. भारतात तयार झालेली कोविशील्ड लस ६५० रुपये आहे.

Biological E या कंपनीची स्थापना डीव्हीके राजू यांनी 1953 साली केली आहे. सुरुवातीला कंपनी केवळ लीवर आणि एंटीकॉगलेंट्स औषधेच बनवत होती.

1963 मध्ये कंपनीने रक्त गोठण्याचा आजार थांबविण्यासाठी हेपारीन बनविण्यास सुरूवात केली आणि खासगी क्षेत्रातील पहिली लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई ठरली.

महिमा डाटला या बायोलॉजिकल ई कंपनीच्या एमडी आहेत. गेल्या 10 महिन्यांपासून कंपनीकडून कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, ते आता पूर्ण झाले आहेत.

बायोलॉजिक ई कंपनीकडून कोरोनावरील कोर्वेवॅक्स ही लस उत्पादीत करण्यात आली असून तिची ही जगातील सर्वात कमी किंमतीची लस ठरू शकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंपनीच्या एमडी महिमा डाटला यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. त्यावेळी, या लसीची किंमत कमीत कमी ठेवावी, असे सूचवले होते.