CoronaVirus Live Updates : कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:23 AM2021-07-14T09:23:57+5:302021-07-14T09:43:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 18 कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. तेथील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीचे तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळतात.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

केरळमधील रुग्णांची संख्या ही जास्त आहे. तर राज्य राज्यांमधील परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर आहे. आकडेवारीनुसार, सिक्किमचा पॉझिटिव्हिटी दर हा 19.5%, मणिपूर 15%, मेघालय 9.4% आणि मिझोरममध्ये 11.8% आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे.

सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात दररोज जवळपास दर दीड मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच सध्या लोकांचा निष्काळजीपणा वाढलेला दिसून येत आहे.

देशातील कोरोनाची पहिली रुग्ण पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. 30 जानेवारी 2020 रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तरुणीला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशात कोरोनाची पहिली रुग्ण आढळून आलेली महिला ही केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यातील आहे. जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. के. जे रिना यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा आरटी-पीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र तिच्यामध्ये सध्या कोणतीही लक्षणं नाहीत.

ती भारतातील पहिली कोरोनाबाधित रुग्ण होती. त्यानंतर आता जवळपास 18 महिन्यांच्या कालावधीनंतर तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुलीला काही कारणांसाठी दिल्लीला जायचं होतं. ज्यासाठी तिचे सॅम्पल घेण्यात आले होते. मात्र तेव्हा तिच्या टेस्टचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.

महिलेची प्रकृती सध्या ठिक असून ती घरीच असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षी ही महिला चीनच्या वुहान शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत होती. याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाली. ती आपल्या सुट्टीसाठी भारतात आली होती. त्यामुळेच ती देशातील कोरोनाची पहिली रुग्ण होती.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास तीन आठवडे उपचार केल्यानंतर महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर तिला 20 फेब्रुवारी 2020 ला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.