विमानतळ की बाग! तब्बल 5000 कोटींचा खर्च; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 01:35 PM2022-11-09T13:35:38+5:302022-11-09T13:40:29+5:30

PM नरेंद्र मोदी परवा बेंगळुरूतील केम्पेगौडा विमानतळाच्या टर्मिनल-2चे उद्घाटन करणार आहेत. पाहा या विमानतळाचे नयनरम्य फोटो...

बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 11 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथील केम्पेगौडा विमानतळाच्या नव्याने बांधलेल्या टर्मिनल-2 (Kempegowda Airport Terminal-2) चे उद्घाटन करणार आहेत.

सुमारे 5,000 कोटी रुपये खर्चून हे टर्मिनल-2 तयार करण्यात आले आहे. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांना खूप चांगल्या सुविधा मिळतील. तसेच, विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता तसेच चेक-इन आणि इमिग्रेशनसाठी काउंटरही दुप्पट होणार आहेत.

108 फुटी पुतळ्याचे अनावरण- केम्पेगौडा विमानतळाची (Kempegowda Airport) प्रवासी हाताळणी क्षमता सध्या वार्षिक 2.5 कोटी आहे, जी टर्मिनल-2 मुळे सुमारे 5-6 कोटींपर्यंत वाढेल.

या टर्मिनलसोबतच पंतप्रधान मोदी या आंतरराष्ट्रीय विमानतळ संकुलात स्थापित केल्या जाणाऱ्या बंगळुरूचे संस्थापक केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरणही करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगळुरू विमानतळाने आधीच संपूर्ण कॅम्पसमध्ये अक्षय ऊर्जेचा (Renewable Energy) 100% वापर करून एक बेंचमार्क सेट केला आहे. या नव्याने बांधलेल्या टर्मिनल-2 ची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

हे टर्मिनल अतिशय आकर्षक दिसत असून, यात झुलती बाग, हिरवेगार गवत आणि फुलांनी सजलेल्या भिंती बसवण्यात आल्या आहेत. या झाडांमुळे परिसरातील वातावरण अतिशय प्रसन्न होणार आहे.

बागेत फिरल्यासारखे वाटेल- केम्पेगौडा विमानतळाचे टर्मिनल 2 हे बंगळुरूचे गार्डन सिटी म्हणून डिझाइन केले आहे. या टर्मिनलला भेट देणाऱ्या प्रवाशांना बागेत फिरल्यासारखे वाटेल.

येथे, 10,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या हिरव्यागार भिंती, हँगिंग गार्डन असेल. म्हणजेच, प्रवासी अतिशय प्रसन्नमय वातावरणातून एअरपोर्टबाहेर पडतील. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही उद्याने भारतात तयार करण्यात आली आहेत.