"राजकारण आम्हाला देखील कळते, कारण...", संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:40 PM2024-04-13T12:40:41+5:302024-04-13T12:42:08+5:30

Lok Sabha Election 2024 : संजय राऊत हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या फिक्सिंगच्या आरोपावरही संजय राऊत यांनी उत्तर दिले.

"We also understand politics, because...", Sanjay Raut's reply to Prakash Ambedkar | "राजकारण आम्हाला देखील कळते, कारण...", संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर 

"राजकारण आम्हाला देखील कळते, कारण...", संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर 

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीसोबत 20 जागा फिक्स केल्या आहेत, असा नवा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांच्या या आरोपाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊत हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या फिक्सिंगच्या आरोपावरही संजय राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही राज्यात जागा फिक्स केल्याचे म्हणतात ते खरे आहे. आम्ही 20 जागांवर भाजपासोबत फिक्सिंग केली आहे, म्हणजेच आम्ही त्यांचा दारुण पराभव करणार आहोत. तिथे भाजपानेही आपला पराभव मान्य केला आहे. राजकारण आम्हाला देखील कळते, देशाचे संविधान जास्त आम्हाला कळत आहे, कारण आम्ही तो संघर्ष करत आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

वंचित बहुजन आघाडीसोबत बिनसल्याच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, आंबेडकरांना विनवण्या केल्या. हात जोडून विनंत्या केल्या. आपण चळवळीचे नुकसान करू नये, अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांना सांगितले. संविधान रक्षणासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्टेसाठी महाविकास आघाडीबरोबर आपण यावे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्याबरोबर यावे, ही आमच्या सर्वांची भूमिका होती, पण ते आमच्यासोबत आले नाहीत, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर यांनी ज्या जागा मागितल्या होत्या, त्यातील सहा जागा आम्ही त्यांना देऊ केल्या होत्या. हे जर का मी खोटे बोलत असेल तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबत विचारावे, ते तुम्हाला सांगतील. वंचित बहुजन आघाडीबाबत तर पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत परखड वक्तव्य केले आहे. सर्वांनी त्यांना सोबत येण्याची विनंती केली होती. पण ते सोबत आले नाहीत ही त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्याविषयी आमच्या मनात कायम आदरभाव असणार आहेत. आज जरी ते सोबत नसले तरी निवडणुकीनंतर ते सोबत येतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

याचबरोबर, छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात महायुतीला उमेदवार मिळत नसल्याचा टोला लगावला. संविधान रक्षणासाठी मोदींच्या हुकूमशाही विरोधात अनेक जातीधर्माचे लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत. बीड मध्ये पंकजाताई यांना निवडणूक जिंकणे सोपे राहिलेले नाही. मराठवाडा महाविकास आघाडीच्या मागे राहील हे चित्र स्पष्ट आहे. राज्यात मिशन 45 असे देवेंद्र सांगत असतील पण आमचा आकडा 35 नक्की आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Web Title: "We also understand politics, because...", Sanjay Raut's reply to Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.