केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:08 PM2024-04-10T13:08:12+5:302024-04-10T13:23:59+5:30

Amit Shah : नरेंद्र मोदींच्या सभेनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. 

Union Home Minister Amit Shah tomorrow in Maharashtra! will Pratap Chikhlikar's campaign in Nanded, Lok Sabha Election 2024 | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला आता वेग आला असून प्रचाराचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. महायुतीसाठी प्रतिष्ठेची जागा असलेल्या रामटेक मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथील सभेनंतर लगेच दोन दिवसांत पुन्हा नरेंद्र मोदींची ही दुसरी सभा होत आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या सभेनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. 

नांदेडमध्ये उद्या अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शाह येणार असून नांदेडमधील नरसी गावात संध्याकाळी पाच वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाचे आणि महायुतीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. 

राज्यात ४५ पारचा नारा देत भाजपाने जोरदार प्रचार मोहीम आखली आहे. त्यासाठी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे. त्यामुळे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात राज्यात सभांचा धुरळा उडणार आहे. तसेच, राज्यात गेल्या निवडणुकीच्या प्रचारातही अमित शाह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण राज्यात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. आता पुन्हा राज्यात अमित शाह यांची सभा होत आहे. त्यामुळे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोदींच्या सभांचा होणार विक्रम
यंदाच्या लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्तीत जास्त सभा घेण्याचा विक्रम करण्याची शक्यता आहे.  २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या सभांच्या तुलनेत ते यावर्षी अधिक सभा घेण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच पंतप्रधान मोदी यांचे दौरे सुरू झाले आणि ते ३० मेपर्यंत चालतील. यादरम्यान, त्यांच्या जवळपास १८० सभा, ३० रोड शोसह २०० पेक्षा अधिक कार्यक्रम होणार आहेत. गतनिवडणुकीत २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जवळपास १४५ सभांना संबोधित केले होते. या निवडणुकीत ते हा रेकॉर्ड लवकरच तोडतील. कारण, उमेदवारांकडून मोदी यांच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. 

Web Title: Union Home Minister Amit Shah tomorrow in Maharashtra! will Pratap Chikhlikar's campaign in Nanded, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.